ओझोन समस्येबाबत भारत हे एक जागरूक राष्ट्र आहे आपणही सहभागी होऊ. - प्रा. डॉ. वीरभद्र दंडे

           


                  

ओझोन दिनानिमित्त प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने 

मॉडेल व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी --

'' नैसर्गिक रीत्या वातावरणात ओझोनाचे संतुलन राखले जाते. परंतु अलीकडील काही दशकात मानवी कृतींमुळे हे संतुलन बिघडत चालले आहे आणि ओझोन थरातील त्याचे प्रमाण घटत आहे. सजीवसृष्टीच्या दृष्टीने ही बाब चिंतेची आहे. ओझोन अवक्षयाचे प्रमुख कारण म्हणजे सीएफसी (क्लोरोफ्ल्युओरोकार्बन). सीएफसी हा वायूचा शीतक, अग्निरोधक, औद्योगिक द्रावक, वायुकलिल (एरोसोल), फवार्‍यातील घटक व रासायनिक अभिक्रियाकारक म्हणून उपयोग होतो. हा वायू वातावरणाच्या वरच्या भागापर्यंत पोहोचतो. तेथे त्याचे विघटन होते आणि त्यातून क्लोरीन वायू निर्माण होतो. हा क्लोरीन ओझोनाचे अपघटन ऑक्सिजनामध्ये करतो. सीएफसीशिवाय अन्य क्लोरीनयुक्त वायूंमुळेही ओझोन नष्ट होऊ शकतो. या वायूंचे स्रोत काही प्रमाणात नैसर्गिक (ज्वालामुखी उद्रेक, सेंद्रिय पदार्थांचे नैसर्गिक विघटन इ.) असले तरी प्रामुख्याने ते मानवनिर्मित आहेत.ओझोन अवक्षय ही एक जागतिक समस्या असल्याचे भान ठेवून भारताने १९९२  मध्ये माँट्रिऑल करारावर स्वाक्षरी केली आहे. मात्र या प्रकारचे करार हे जगातील सर्व राष्ट्रांच्या दृष्टीने  सामान्य व न्याय्य स्वरूपाचे असावेत, ही भारताची ठाम भूमिका आहे. ओझोन समस्येबाबत भारत हे एक जागरूक राष्ट्र आहे आपणही सहभागी होऊ. ''   असे सविस्तर मार्गदर्शन  दयानंद महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख  प्रा. डॉ. विरभद्र दंडे यांनी केले.  ते संगमेश्वर कॉलेज  प्राणिशास्त्र विभाग आयोजित ओझोन दिनानिमित्त आयोजित मॉडेल आणि पोस्टर प्रदर्शनाच्या  उद्घाटन प्रसंगी  बोलत होते.  यावेळी  मंचावर  प्र.प्राचार्य ऋतुराज बुवा,  विभाग प्रमुख प्रा. डॉ.   महानंदा बगले, प्रा. डॉ.एस.एस.पाटील,  प्रा.स्वरूपा दामा, प्रा. डॉ. आनंद चव्हाण, डॉ. विजयकुमार मुलीमनी आदी उपस्थित होते.

प्रारंभी पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी  पोस्टर प्रदर्शनाची प्रशंसा केली.  कॉलेजच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर  त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ओझोन विषयी प्रा.डॉ. महानंदा बगले  सविस्तर माहिती देत बोलताना म्हणाल्या  की,''ओझोन हा वायू मुळात प्राणवायूचे संयुग आहे. ओझोन हा प्राणवायूच्या ३ अणूंपासून बनलेला असून त्याचे रेणुसूत्र O3 असे आहे. शास्त्रीय दृष्टीने ओझोनचा थर हा पृथ्वीपासून १६ ते २३ किलोमीटरच्या पट्ट्यात आढळतो. ओझोन हा सूर्यापासून येणाऱ्या अतीनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा बचाव करतो.'' याप्रसंगी प्राणशास्त्र विभागातील विद्यार्थी  उपस्थित होते.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा