'संगमेश्वर' मध्ये समाजविज्ञान संशोधन पध्दतीवर राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न
सत्य मांडण्याची ताकद संशोधकात हवी : डॉ. गौतम कांबळे
सोलापूर प्रतिनिधी --
संशोधन हे क्षेत्र मानवी विकासासाठी पूरक असणारे असते. यातून नवनवीन तथ्यांचा शोध घेत गेल्यामुळे मानसाच्या जीवनाला उपयुक्त ठरणारे संशोधन निर्माण होते. यासाठी सामाजिक संशोधनात कार्य करणाऱ्या संशोधकांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणारी आहे. म्हणून संशोधक हा सत्यशोधन करणारा, नैतिकता असणारा, सामाजिक भूमिका जपणारा आणि गुणवत्तापूर्ण संशोधन करणारा असावा. त्याच्यामध्ये संशोधनाअंती हाती आलेले सत्य मांडण्याची ताकद असायला हवी. तरच हो खरा संशोधक असतो. असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विभागाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी मांडले.
संगमेश्वर कॉलेजमधील पदव्युत्तर विभागाच्या वतीने सामाजिक विज्ञानातील संशोधन पध्दती या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजशेखर येळीकर, डॉ. संपत काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डॉ. कांबळे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धारण २०२० मधील संशोधनाच्या वैशिष्ट्यपूर्ण मुद्याची मांडणी केली. हे धोरण म्हणजे जगातील उत्कृष्ट प्रात्यक्षिकांचा नमुना आहे. परंतु याची अम्मलबजावणी गुणवत्तापूर्ण संशोधनातून साध्य होणे गरजेचे आहे. यासाठी नव्या संशोधकांनी अत्यंत सजगपणे संशोधन करायला हवे. आपले संशोधन केवळ एखाद्या पदवीसाठी न करता समाजाच्या विकासासाठीची व्यापक दृष्टी त्यामागे असायला हवी. सामाजिक संशोधनामध्ये सत्याचा शोध महत्त्वाचा असतो. यातून समाजातील प्रश्न शोधले जातात. त्यांची उत्तरे मिळविली जातात. यातून योग्य उपाय योजना राबविता येतात. त्यामुळे सामाजिक संशोधन क्षेत्रातील संशोधकांनी गुणवत्तापूर्ण संशोधन करणे गरजेचे आहे. असे मत मांडले. अध्यक्षीय समारोपात डॉ. येळीकर यांनी संशोधनात परखडता असायला हवी. त्यासाठी मूलभूत संशोधनावर सर्वांनी भर द्यायला हवा. आजच्या काळात संशोधनाची साधने मोठयाप्रमाणात निर्माण झालेली असून त्यांचा फायदा संशोधकांनी करून घ्यावा. असा सल्ला दिला.
चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात टाटा इन्स्टीटयुट ऑफ सोशल सयान्स्, तुळजापूर येथील डॉ. संपत काळे यांनी बीजभाषण केले. त्यामध्ये त्यांनी सामाजिक संशोधन पध्द्ती विषयी विचार मांडले. सामाजिक संशोधन करताना संशोधकाला प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर जावून माहिती गोळा करावी लागते. यासाठी त्याच्याकडे संयम, अभ्यास आणि नियोजन असणे गरजेचे आहे. आदिवासी, भटके विमुक्त् समाज, ग्रामीण भागातील संशोधन करताना अत्यंत आत्मियतेने ते करावे लागते. या लोकांच्या समस्या जानून घेऊन त्यावर वास्तवदर्शी पध्दतीने संशोधन करणे गरजेचे आहे. कारण या सामाजिक संशोधनातूनच संबंधित समाजांचा विकास होऊ शकतो. यासाठीची संशोधनशास्त्रीय मांडणी डॉ. काळे यांनी केली. दुसऱ्या सत्रात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर येथील राज्यशास्त्राचे प्रमुख डॉ. पी. एम. जगताप यांनी संशोधनाच्या विविध पध्दतीमधील क्षेत्रीय अभ्यासाचे महत्त्व, उपलब्ध साधनाचा संशोधनासाठी योग्य वापर आणि संशोधनाच्या लेखनपध्दतीवर आपले विचार मांडले. चर्चासत्रात संशोधक विद्यार्थ्यांनी शोधनिबंधांचे सादरीकरण केले. त्यातील उत्कृष्ट सादरीकरणासाठी डॉ . जम्मा, कु. रिद्धी बुवा, कु. पुजा स्वामी यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्रातील १६५ संशोधकांनी सहभाग घेतला.
उद्घाटकीय सत्राचे स्वागत कॉलेजचे प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी केले. चर्चासत्राची भूमिका समन्वयक डॉ. शिवाजी मस्के यांनी मांडली. पाहुण्यांचा परिचय डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी करून दिला. तर सूत्रसंचालन डॉ. मंजू संगेपांग यांनी केले. आभार डॉ. राजकुमार खिलारे यांनी मानले. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी, प्रा. विष्णू विटेकर, डॉ. संघप्रकाश दुड्डे, प्रा. शिरीष जाधव, प्रा. हल्लोळी, प्रा. सोलापुरे, डॉ. प्रविण राजगुरू, डॉ रेश्मा शेख, श्री. मोहन काळे, श्री. सुधीर कुलकर्णी, श्री. वैजू स्वामी व श्री. बच्चाव यांनी विशेष श्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा