संगमेश्वर कॉलेजमध्ये कवी कुलगुरू कालिदास दिन साजरा
कालिदासो जने जने, कंठे कंठे संस्कृतम्
सोलापूर ( दिनांक ६ जुलै )
आज ‘महाकवी कालिदास दिन.’ कालिदासाचा जन्मदिन, जन्मतारीख उपलब्ध नाही पण मेघदूतातल्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दयोजनेमुळे कालिदास या तिथीशी एवढा जोडला गेला की, ‘आषाढ प्रतिपदा’ हा दिवस ‘कालिदास दिन’ म्हणून साजरा केला जातो. संस्कृत साहित्यातील कालिदास हा असा एकमेव साहित्यकार आहे की, ज्याच्या काव्यातील एका उल्लेखामुळे तो दिवस त्याच्या नावाने ओळखला जातो. केवळ संस्कृत वाङ्मयातच नव्हे, तर संपूर्ण जागतिक वाङ्मयांत कविकुलगुरू कालिदासाचे स्थान अद्वितीय आहे.
भारतीय परंपरा आणि पाश्चात्त्य अभ्यासक या दोघांनीही सर्वश्रेष्ठ संस्कृत कवी म्हणून कालिदासाचा गौरव केला. त्याचा काळ कोणताही असो, त्याने काळमार्गावर उमटवलेली मुद्रा इतकी ठळक आहे की, दीड हजार वर्षे उलटून गेली तरी त्याचे स्थान अढळ आहे. तत्तुल्यकवेराभावात - अजूनही त्या तोडीच्या दुसर्या कवीचे नाव आढळले नाही, म्हणून ‘अनामिका सार्थवती बभूव’ अनामिका हे बोटाचे नाव सार्थ झाले. म्हणूनच, या श्लोकात कालिदासाची सर्व महती आहे, असे मला वाटते. असे प्रतिपादन प्रदीप आर्य यांनी केले. असे प्रतिपादन प्रदीप आर्य यांनी केले ते संस्कृत दिनाच्या निमित्ताने संवाद साधत होते. याप्रसंगी मंचावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे उपस्थित होते.
प्रारंभी कालिदासो जने जने, कंठे कंठे संस्कृतम् या रचनेचे गायन स्वरदा मोहोळकर हिने केले. त्यानंतर कवी कुलगुरू कालिदासांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित यांच्या हस्ते झाले.याच कार्यक्रमात आद्य शंकराचार्य रचित संस्कृत स्तोत्र आणि काव्यपाठाचे गायन रश्मी कन्नूरकर, शंकर कोमूलवार यांनी केले . कवी कुलगुरू कालिदासाच्या जीवन चरित्राविषयी दर्शन गोडसे या विद्यार्थ्याने स्पष्ट केले.शेवटी उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी आपल्या मनोगतात संस्कृतचे भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीतले महत्त्व अधोरेखित केले. प्रसंगी प्रा. शिवराज पाटील, शंकर कोमुलवार, रश्मी कन्नूरकर, दत्तात्रय गुड्डेवाडी, विश्वनाथ कक्कळमेली,हर्षवर्धन पाटील,संतोष पवार, मल्लिकार्जून पाटील आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा