वाचनातून तरुण पिढी संवादी होईल –डॉ. शिवाजी शिंदे
संगमेश्वर कॉलेजमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम
सोलापूर :
वाचन ही एक कला आहे. तिचे संस्कार व्हावे लागतात. लहानपणापासून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केल्यास ते जीवनात यशस्वी होऊ शकतात. परंतु अलीकडे तरुण पिढी मोबाईलच्या आहारी जात असून त्यांचे ग्रंथवाचन, वृत्तपत्रांचे वाचन कमी झालेले आहे. यातून संवाद हरवत चालला आहे. जेथे संवाद हरवतो. तेथे विसंवाद निर्माण होतो. हा विसंवाद संपवायचा असेल तर वाचन हा एक पर्याय आहे. वाचनातून तरुण पिढी संवादी होईल असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील उपकुलसचिव व सुप्रसिध्द कवी डॉ. शिवाजी शिंदे यांनी मांडले.
संगमेश्वर कॉलेजमध्ये महाराष्ट्र् शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारा ‘वाचन संकल्प् महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत सामुहिक वाचन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मार्गदर्शक म्हणून डॉ. शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा होते. याप्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाचे विविध आयाम विशद करून सांगितले. वाचन ही संस्कारूपी गोष्ट् आहे. त्याचे संस्कार लहानपणापासूनच व्हायला हवेत. कॉलेज जीवनात ग्रंथालयात जावून विविध ग्रंथांचे, मासिकांचे वाचन करणे हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते. नवनवीन ग्रंथ वाचल्याने आपल्याला नव्या जगाचे भान मिळते. आपले भाषिक ज्ञान वाढते. शब्दांचे संस्कार होऊन आपला शब्दसंग्रह वाढतो. त्यामुळे वाचन हे प्रगल्भ व्य्क्तिमत्त्व घडविण्यासाठी एक कार्यशाळाचा असते. याचे ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसाद करावे. शेवटी त्यांनी वाचनाची सप्तसूत्री विशद केली. त्यामध्ये वाचन करताना शब्दबोध करून घ्यावा. विशिष्ट दिशांनी वाचन करावे. वाचनात आपली नजर स्थिर ठेवायला हवी. यामध्ये दृष्टिक्षेप अतिशय महत्त्वाचा असतो. मोठयाने वाचन करावे. यातून आपले उच्चार सुधारतात. मूळ अर्थाचे आकलन करूनच वाचन करावे. यांचा समावेश होतो. वाचन हा संवादमार्ग आहे. नव्या पिढीने याचा अंगीकार करावा असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. बुवा यांनी महाराष्ट्र शासनाच्या 'वाचन संवाद महाराष्ट्राचा' या उपक्रमाची माहिती दिली. कॉलेजच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याने सहभाग नोंदवावा. ही एक संधी असून यातून नक्कीच आपल्या ज्ञानात भर पडेल असे मत मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. दादासाहेब खांडेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. सागर सुरवसे यांनी तर आभार डॉ. रेश्मा जावळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल डॉ. विजयकुमार मुलीमनी, डॉ. रामचद्र संगशेट्टी, डॉ. अण्णासाहेब साखरे, प्रा. शहानूर शेख, डॉ. शीला रामपुरे, डॉ. संघप्रकाश दुड्डे, डॉ. सुनिता सरवदे, डॉ. संगीता कामत, प्रा. रेश्मा सर्वे, डॉ. रेश्मा शेख, सहा.ग्रंथपाल संतोष कुलकर्णी, डॉ. प्रवीण राजगुरू याबरोबर विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा