परीक्षेला जाता जाता



दैनिक संचार , सोलापूर आवृत्तीतील लेख

 परीक्षेला जाता जाता

परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी चांगला अभ्यास करण्याबरोबरच उत्तरप्रत्रिका कशी लिहितो यावर आपल्याला किती गुण मिळणार हे अवलंबून असते. अभ्यास चांगला करूनही व्यवस्थित उत्तरपत्रिका लिहिली नाही तर चांगले गुण मिळू शकत नाहीत. म्हणूनच उत्तरपत्रिका चांगली लिहिण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे याविषयी जाणून घेणे आवश्यक ठरते. आपल्या हातात प्रश्नपत्रिका पडल्यानंतर ती शांतपणे वाचली पाहिजे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व्यवस्थित समजावून घेतले पाहिजे. अनेकदा प्रश्न व्यवस्थित न वाचल्याने त्याची उत्तरे आपण योग्य रीतीने लिहू शकत नाही. तसे झाल्यास आपल्याला चांगले गुण मिळू शकत नाहीत. प्रश्नपत्रिका वाचत असतानाच आपण उत्तरे कोणत्या पद्धतीने लिहिली पाहिजेत याचा आराखडा तयार करणे आवश्यक आहे. काही प्रश्नांची उत्तरे दीर्घ स्वरूपात लिहिणे आवश्यक असते; तर काहींची उत्तरे एका वाक्यात एका शब्दात लिहावयाची असतात. भाषा विषयांचे न सोडविताना काळजी घेणे आवश्यक असते.



ज्या प्रश्नांकरिता अधिक गुण आहेत किंवा जे प्रश्न आपण लवकर सोडवू शकतो असेच प्रश्न हातात घेऊन लिहिण्यास सुरुवात केली पाहिजे. तसेच आपल्याला पाचपैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवण्यास सांगितले गेले असेल तर प्रथम आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तरे चांगल्या पद्धतीने लिहिता येण्याचा विश्वास असतो, त्याच प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करा. तसेच हुकमी गुण मिळवून देणारे गाळलेल्या जागा भरा, जोड्या लावा यासारखे प्रश्न पटकन सोडवून टाका. दीर्घ स्वरूपाची उत्तरे लिहिताना गाळलेल्या जागा भरा, जोड्या लावा यासारखे हुकमी गुण मिळवून देणारे प्रश्न सोडवण्याचे राहून जाऊ शकते.

सुवाच्य अक्षर  :

 उत्तर पत्रिका लिहिताना अक्षर सुवाच्य असले पाहिजे. प्रत्येकाचे अक्षर चांगले, वळणदार असते असे नाही. मात्र, आपण उत्तर पत्रिका तपासणाऱ्या व्यक्तीला आपले अक्षर व्यवस्थित वाचता येईल अशा पद्धतीचे असले पाहिजे. त्यात खाडाखोड करू नये. उत्तरपत्रिका स्वच्छ असली पाहिजे. हस्ताक्षर चांगले असेल तर आपल्याबद्दल प्रश्नपत्रिका तपासणाऱ्याचे मत चांगले होते. उत्तरे अचूक लिहिली असलीत पण गिचमिड अक्षरांमुळे उत्तरपत्रिका तपासणाऱ्या व्यक्तीला ती वाचताच आली नाहीत तर तुम्हाला चांगले गुण मिळू शकत नाहीत. म्हणूनच विद्यार्थ्यांनी चांगले अक्षर काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. खाडाखोड करणे, गिचमिड करणे यांसारख्या प्रकाराने आपल्याबद्दलचे मत प्रतिकूल होऊ शकते.

शब्दमर्यादा पाळा : 

प्रश्नपत्रिकेत आपल्याला ज्या शब्दमर्यादेत उत्तर लिहिण्यास सांगितले आहे ती शब्दमर्यादा परीक्षार्थीनी पाळल्यास चांगले गुण मिळण्याची शाश्वती निर्माण होते. संदर्भासहित स्पष्टीकरण द्या, यासारख्या प्रश्नांची उत्तरे लिहिताना ती विस्तारानेच लिहिली पाहिजेत. प्रश्न विचारण्यामागचा मुख्य उद्देश उत्तरातून स्पष्ट होणे आवश्यक असते. प्रश्नपत्रिका तपासणारी व्यक्ती किती नेमकेपणाने उत्तर लिहिले आहे, याकडे बारकाईने लक्ष ठेवून असते. जर तुम्ही मूळ उत्तराऐवजी फापटपसाराच लिहिला आणि त्याद्वारे उत्तरपत्रिकेची जागा व्यापून टाकली तर तुम्हाला चांगले गुण मिळणे अवघड होते.


निबंध लिहिताना : 

निबंधासारख्या प्रश्नाची उत्तरे विशिष्ट शब्दमर्यादेत लिहिणे अपेक्षित असते. अशा वेळी आपण आपला मुद्दा नेमकेपणे किती शब्दात मांडतो याला महत्त्व असते. निबंधासारख्या प्रश्नात अधिक गुण मिळत नाहीत, असे सांगितले जाते. मात्र, आपण निबंध लिहिण्याची तयारी व्यवस्थित केली असेल तर या प्रश्नातही आपल्याला चांगले गुण मिळू शकतात. निबंध लिहिताना तुम्ही म्हणी, वाक्प्रचार यांचा आधार घेतल्यास ते उपयुक्त ठरते. उत्तरे प्रश्नांच्या क्रमानुसारच लिहा : ज्या क्रमाने प्रश्न विचारले आहेत, त्या क्रमानेच प्रश्नांची उत्तरे लिहिली तर उत्तरपत्रिका तपासणे सोपे जाते. आपण त्यादृष्टीने उत्तरपत्रिका लिहिण्याचा सराव करायला हवा. तुम्हाला शेवटच्या प्रश्नाचे उत्तर लिहिता येत असेल तर ते उत्तर आधी लिहून काढा. मात्र, उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावरच शेवटच्या प्रश्नाचे उत्तर असले तर ते सोईचे ठरते. मधली पाने उर्वरित प्रश्नांसाठी राखीव ठेवा. क्रमानुसार उत्तरे लिहिणे चालू करा. एखाद्या प्रश्नाचे उत्तर आठवत नसेल तर त्यासाठीची जागा रिकामी ठेवा आणि जेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर आठवेल त्यावेळी ते लिहा.

नेमकेपणाने उत्तरे लिहा : प्रश्नाचे उत्तर ज्या पद्धतीने अपेक्षित आहे, त्याच पद्धतीने ते लिहिले गेले पाहिजे. प्रश्नासंदर्भातील उत्तर सोडून अन्य माहिती तुम्ही उत्तर म्हणून लिहिली तर त्यात तुम्हाला चांगले गुण मिळण्याची शक्यता कमी होते.

व्याकरणाकडे लक्ष द्या: भाषा विषयांची प्रश्नपत्रिका सोडविताना आपण आपले व्याकरण शुद्ध असेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भाषेच्या उत्तरपत्रिका लिहिताना व्याकरणात्मक चुका तसेच अशुद्ध लिहिणे टाळले पाहिजे. जर अशुद्ध लिहिली किंवा तुमच्या स्पेलिंगमध्ये चुका असतील तर गुण आपोआप कमी होतील हेही लक्षात ठेवले पाहिजे. त्यासाठी आपले व्याकरण चांगले असले पाहिजे व शब्दांची स्पेलिंग अचूक असली पाहिजेत. उत्तरपत्रिका लिहिताना घाईत शब्दांच्या वाक्यांच्या व्याकरणात चुका होणे शक्य असते. अशा वेळी उत्तरे लिहितानाच ती व्याकरणदृष्ट्या अचूक आहेत, त्यातील स्पेलिंग चुकीची नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे. अशा बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष ठेवले तर आपल्याला चांगले गुण मिळवणे अवघड जाणार नाही.

घड्याळाकडे नजर ठेवा :
 आपल्याला उत्तरपत्रिका किती वेळात लिहून संपवायची आहे, याचे भान असणे आवश्यक आहे. त्याकरिता घड्याळावर नजर ठेवत उत्तरपत्रिका लिहिली पाहिजे. जर घड्याळाकडे नजर नसेल तर आपण काही प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी वेळच ठेवू शकत नाही. म्हणजे, काही प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहिण्याच्या नादात आपला निर्धारित वेळ संपत आला आहे, याची जाणीव आपल्याला राहात नाही. ती जाणीव न राहिल्याने आपले काही प्रश्न सोडवायचेच राहतात. तसे झाले तर आपल्याला कमी गुण मिळणार हे उघडच असते. जर तुम्ही १०० पैकी ८० गुणांच्या प्रश्नांची उत्तरे लिहिली असतील तर तुम्हाला त्याचप्रमाणात गुण मिळणार हे लक्षात ठेवा. म्हणूनचघड्याळाकडे नजर ठेवून उत्तरे लिहा. तसे केले तरच आपण सर्व प्रश्नांची उत्तरे निर्धारित वेळेत लिहू शकू.

   प्रा. पोपट नाईकनवरे








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा