पालकांचे आचरण हे मुलांसाठी अनुकरणीय असते - डॉ.गुरुराज करजगी
' पालकत्व एक कला ' या विषयावर व्याख्यान
सोलापूर ( दिनांक २७ )
'' पालक हे मुलांचे आदर्श असतात त्यामुळे पालकांचे आचरण हे मुलांसाठी अनुकरणीय असते. असे प्रतिपादन ॲकॅडमी फोर क्रिएटिव्ह टीचिंग बंगळूरूचे चेअरमन डॉ. गुरुराज करजगी यांनी केलं. सोमवारी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अप्पासाहेब काडादी प्रबोधन मंच यांच्यावतीने संगमेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात डॉ.गुरुराज करजगी यांचे ' पालकत्व एक कला ' या विषयावर व्याख्यान झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी अप्पासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी यांनी शिक्षणाची गरज ओळखून कर्मयोगी अप्पासाहेबांनी शैक्षणिक संस्था उभारल्या स्वतःच्या कृतीद्वारे मुलांना शिस्तीचे स्वावलंबनाचे धडे दिले. असे सांगून सोलापुरातील पालकांशी हितगुज साधण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन केले असल्याचं त्यांनी सांगितलं.
आपल्या व्याख्यानात डॉ. करजगी यांनी अति काळजी करणारा पालक वर्ग, निष्काळजी पालक वर्ग, आणि कडक शिस्तीचा पालक वर्ग या तीन मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले काही पालक न मागता अनेक सुखवस्तू देतात, पण वस्तूंचे मूल्य न कळाल्याने नातेसंबंधाचे महत्त्व ही मुले विसरतात. सुजाण पालक होण्यासाठी मुलांचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. मुलांच्या भावना व्यवस्थितपणे हाताळा.त्यांच्यासाठी कुटुंबासाठी वेळ काढा. आपल्या बालपणीचे प्रसंग त्यांना सांगून बोलते करा. मुलांसमोर नकारात्मक न बोलता त्यांना चांगल्या कामासाठी प्रेरणा द्या. दुसऱ्या मुलांची आपल्या मुलांशी तुलना न करता त्यांना पाठिंबा द्या. अशा टिप्स त्यांनी उपस्थित पालकांना दिल्या.
व्याख्यानानंतर पालकांना पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही डॉक्टर करजगी यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र देसाई यांनी केले. पाहुण्यांचे परिचय शुभांगी गावंडे यांनी करून दिला सूत्रसंचालन पुष्पांजली मैत्री आणि संतोष पवार यांनी केले. कार्यक्रमास प्रा.केशव शिंदे, माजी प्राचार्य नरेश बदनोरे विधिदनी रा. गो. मेत्रस, पुष्पराज काडादी, ज्योती काडादी, शितल काडादी, तेजश्री काडादी, विश्वनाथ बऱ्हाणपुरे, गंगाधर कुमठेकर, भीमाशंकर पटणे, गुरुराज माळगे, ऍडव्होकेट आर. एस. पाटील, प्रा.डॉ. राजशेखर येळीकर, मल्लिकार्जुन कळके, सी.बी. नाडगौडा ,यांच्यासह सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुल, संगमेश्वर शिक्षण संकुल, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना शिक्षण संकुलातील मुख्याध्यापक , शिक्षक , पालक आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा