स्त्रियांनी खंबीरपणे अभिव्यक्त व्हावे – समीर गायकवाड
संगमेश्वरमध्ये मराठी वाङ् मय मंडळाचे उद्घाटन
सोलापूर प्रतिनिधी
''आजच्या काळात स्त्रियांचे प्रश्न अधिक गंभीर बनत चालले आहेत. त्यांचे जीवन नवनवीन समस्यांनी बाधित झालेले आहे. स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील अन्याय अत्याचारांच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. यासाठी स्त्रीने शिक्षित, सजग व जागृत होणे खूप गरजेचे आहे. त्याबरोबरच आपल्यावरील कोणत्याही प्रसंगाला खंबीरपणे तोंड देत, आपल्यावरील अन्यायाविरुध्द अभिव्यक्त झाले पाहिजे. त्याशिवाय पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीला सन्मान मिळणार नाही.'' असे विचार प्रख्यात लेखक समीर गायकवाड यांनी मांडले.
संगमेश्वर कॉलेजमधील मराठी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ मधील मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेचे उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख सुहास पुजारी होते. गायकवाड यांनी स्त्रीजीवन आणि माझे लेखन या विषयाव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय समाजजीवनातील स्थान आणि त्याला उजागर करणा-या साहित्याचे चिंतन मांडताना व्यक्त् केले. भारतीय समाजात सातत्याने स्त्रीजीवनाला दुय्यम स्थान दिले जाते. एका बाजुला तिला दैवत्व द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला तिला गुलाम करून ठेवायचे. हा दुटप्पीपणा पुरुषसत्ताक व्यवस्थेतून आलेला आहे. लिंगभेद, स्त्रीशोषण आणि अन्याय अत्याचारामध्ये स्त्रीजीवन अडकून गेलेले आहे. त्यातच देशात वेश्या व्यवसायातील स्त्रियांचे जगणे अतिशय भयावह आहे. तिला मानसिक विकृतींशी मुकाबला करावा लागत आहे. असे विचार गायकवाड यांनी मांडले. त्यांनी देशातील विविध भागामध्ये असलेल्या रेड लाईट भागातील स्त्रियांची अनेक उदाहरणे देत तेथील परस्थितीवर भाष्य केले. लेखकांनी या स्त्रीजीवनाचा शोध घेतला पाहिजे. त्याची मांडणी आपल्या लेखनात केले पाहिजे. वास्तवदर्शी, अनुभवसंपन्न लेखनच अस्सल असते. वाचकाला ते प्रेरीत करते. आजच्या स्त्रियांनी असे स्त्रीजीवनकेंद्री साहित्याचे वाचन करावे. आपला कणा ताठ ठेवावा. ठाम भूमिका घ्यावी. असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. पुजारी यांनी संगमेश्वर कॉलेजमधील मराठी विभागाची परंपरा विशद केली. विद्यार्थीकेंद्री अशा उपक्रमातून प्रेरणा घ्यावी. स्त्री-पुरुष असा भेदभाव करू नये. तर प्रत्येक स्त्रीच्या पाठीशी उभे रहावे. असे विचार त्यांनी मांडले.
कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय समन्वयक डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. रेश्मा सुर्वे यांनी तर आभार प्रा. सागर सुरवसे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. संतोष पवार, डॉ. संघप्रकाश दुड्डे, डॉ. नंदा साठे, डॉ. रेश्मा शेख, डॉ. रेश्मा जावळे तसेच वाङ्मय मंडळातील विद्यार्थी प्रतिनिधी मिनाक्षी बनसोडे, गायत्री मेट्रे, प्रियंका साखरे, पायल अवचारे, मृण्मयी दिवाणजी, ज्योती बंडगर, भक्ती कुलकर्णी, आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा