विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'
संगमेश्वर कॉलेजच्या मराठी विभागाचा उपक्रम
सोलापूर प्रतिनिधी
'श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे.' या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ओळींप्रमाणे निसर्गाची किमया पाहताना,अनुभवताना 'सावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची, वाट हळवी वेचताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे' अशा सदाबहार पाऊस गाण्यांच्या सादरीकरणांनी विद्यार्थ्यांनी पावसावरील कवितांचा पाऊस पाडला. निमित्त होते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागात मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या पाऊसगाणी सादरीकरणाचे. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, कला विभागप्रमुख शिवशरण दुलंगे वाणिज्य विभागप्रमुख बसय्या हणमगाव यांची उपस्थिती होती.
प्रारंभीक तांत्रिक व सादरीकरणाच्या सूचना प्रा.संतोष पवार यांनी दिल्या. प्रा.अशोक निंबर्गी यांनी मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या काव्यवाचन आणि सादरीकरण उपक्रमाची माहिती देत प्रास्ताविक केलं.उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी कविता सादर करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी मराठी सारस्वतांच्या गाजलेल्या कविता सादर केल्या, काही विद्यार्थ्यांनी सामूहिक अभिवाचन केलं. काहींनी उत्स्फूर्त चालींवर कविता म्हटल्या. रिमझिम पडणाऱ्या श्रावणसरी आणि पावसाळ्यातील निसर्ग विविधतेचे सार्थ वर्णन करणारे शब्दआणि गेयपूर्ण कविता ऐकताना विद्यार्थी प्राध्यापकगण चिंब पावसात भिजून निघाले.
स्पर्धेचा निकाल - स्वरदा मोहोळकर - प्रथम, अवनी अहुजा ( हिंदी) - द्वितीय विभागून, समीक्षा डोके- द्वितीय विभागून, विराज चांदगोळी - तृतीय ,आरती ओहाळ -चौथा क्रमांक, समर्थ खरात - पाचवा क्रमांक
प्रा.कोमल कोंडा, प्रा.रश्मी कन्नूरकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. या प्रसंगी बोलताना प्राचार्य म्हणाले, '' संगमेश्वरच्या व्यासपीठाचा उपयोग करून जीवनात उत्तम असे करियर करा.'' प्रेरणादायी ग्रंथ, पुष्प देऊन विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.प्रा. विश्वनाथ कक्कळमेली यांनी उत्स्फूर्त कविता सादर केल्या.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक,विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. प्रा.दत्तात्रय गुड्डेवाडी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.एस. बी. निंबर्गी यांनी आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा