यशस्वी जीवनासाठी पंचसूत्रांचा अवलंब करावा – मा. दिलीप स्वामी
विद्यार्थी जीवनात यश प्राप्त करणे ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी कठोर परिश्रम करावेत असे सांगितले जाते. जिद्द, चिकाटी, परिश्रम या बरोबर मनात इच्छा असणे खूप गरजेचे आहे. मानसिक तयारी परीपूर्ण केल्यास यशाचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने सर्व प्रथम मनाची तयारी करावी म्हणूनच दृढनिश्चय हाच यशाचा मार्ग आहे असे विचार सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दिलीप स्वामी यांनी मांडले. संगमेश्वर कॉलेज मध्ये करिअर कट्टा आणि बी. ए. नागरी सेवा यांच्या वतीने ‘स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. या प्रसंगी मा. स्वामी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. सुहास पुजारी होते. मा. स्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या यशस्वी जीवनाचे अनुभव सांगितले. संघर्षाशिवाय जीवनात यश मिळत नसते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनात अधिक जागृत रहावे. एक अधिकारी होण्याचे स्वप्न पहावे, स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर पाच सूत्रे अंगीकृत करावीत. त्यामध्ये आई-वडील व गुरु यांच्या आज्ञाचे पालन, ध्येय निश्चिती, कठोर परिश्रम, वेळेचे व अभ्यासाचे नियोजन आणि आत्मविश्वास या गोष्टी महत्वाच्या आहेत असे मुलभूत विचार त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. डॉ. शिवाजी मस्के यांनी करिअर कट्ट्याची माहिती देऊन केले. कायर्क्रमाचे सूत्रसंचालन कु. शोभा गाडेकर, पाहुण्यांचा परिचय कु. हर्षा श्रीगन तर आभार कु. ऋतुजा गवळी यांनी मानले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा