समर्पित भावनेने प्र.प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई यांनी कार्य केले
संगमेश्वर कॉलेजमध्ये सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
सोलापूर ( दिनांक ३० नोव्हेंबर) '' प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांनी समर्पित भावनेने केलेले कार्य पुढच्या पिढीला मार्गदर्शक आहे. '' असे गौरव उदगार संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी यांनी काढले. ते प्र.प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या सत्कार समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे निमंत्रित शैक्षणिक सल्लागार डॉ.प्रमोद दर्गोपाटील, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.गोटे,सौ.सौ माधवी देसाई आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी आपल्या प्रास्ताविकात प्राचार्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर संस्थेच्या वतीने प्राचार्य प्र. डॉ.राजेंद्र देसाई यांचा सपत्नीक सत्कार झाला. त्यानंतर प्रा .डॉ.एस. एस. पाटील,प्रा.शहानुर शेख,डॉ.शुभांगी गावंडे, चंद्रकांत हिरतोट,डॉ. वंदना पुरोहित,डॉ.प्रमोद दर्गोपाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी म्हणाले की, ''डॉ.राजेंद्र देसाई यांनी अभ्यासू प्राध्यापक आणि उत्तम प्रशासकीय क्षमता असलेले प्राचार्य म्हणून उत्कृष्ट कार्य केले. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार त्यांनी उत्तम रीतीने नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.''
कॉलेजच्या वतीने केलेल्या सत्काराला उत्तर देताना , '' कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी यांनी दिलेल्या संधीचं सोनं करत मी कार्यरत राहिलो. विद्यार्थी म्हणून या कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि याच कॉलेजचा एक अध्यापक,प्राचार्य म्हणून आज निवृत्त होताना मी अत्यंत समाधानी आहे. या समाधानी जीवन प्रवासामध्ये काडादी कुटुंबीयांनी आमच्यावर केलेले प्रेम आणि विश्वास हे शब्दातअवर्णनीय आहे.'' अश्या कृतज्ञ भावना प्राचार्य प्र. डॉ. राजेंद्र देसाई यांनी व्यक्त केल्या.
अध्यक्षीय भाषणात धर्मराज काडादी पुढे म्हणाले की,'' सेवानिवृत्ती नंतरच्या काळात सरांनी जगातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या देशांची भ्रमंती करून जगातल्या शिक्षण संस्थांचा अभ्यास करून आपल्या संस्थेस मार्गदर्शन करावे.संस्थेशी आपला असलेला ऋणानुबंध असाच कायम ठेवावा.'' याप्रसंगी जावई युगंधर चंदले, कन्या संप्रिता चंदले, नातू युवान यांच्यासह वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आरती दिवटे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा