संगमेश्वर कॉलेजला विद्यापीठाचा डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक
क्रीडा क्षेत्रातील सलग उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचा झाला सन्मान
सोलापूर क्रीडा प्रतिनिधी -
डॉ. पुरणचंद पुंजाल चषक प्रतिवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॉलेजला दिला जातो. विद्यापीठाने पुरस्कार सुरू केल्यापासून सलग हा मान संगमेश्वर कॉलेजला मिळाल्याने संस्थेच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रारंभी डॉ. पुरणचंद पुंजाल चषक घेऊन विद्यार्थ्यांनी मैदानावर जल्लोष केला. ही जल्लोषाची रॅली कॉलेजच्या मुख्य इमारती जवळ आली. तिथे सत्काराचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा यांनी केले. त्यात त्यांनी संगमेश्वर कॉलेजच्या शिवाजी विद्यापीठापासूनच्या दैदीप्यमान परंपरेची माहिती देत. आपणही या विभागाचे एकेकाळचे खेळाडू होतो, याची आठवण करून देत क्रीडा विभागातील सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना धर्मराज काडादी यांनी विद्यापीठाचा हा बहुमान सलग आपल्याच कॉलेजला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की,'' शिवाजी विद्यापीठापासून आपले महाविद्यालय अग्रेसर राहिलेले आहे. नागेशकर ट्रॉफी पासून आपण क्रिकेट, कबड्डी,खो-खो यासह वैयक्तिक खेळ आणि आता ऑलिंपिकला खेळले जाणारे खेळ त्याच्यासाठी लागणारा सराव कॉलेज कडून घेतला जातो. विशेष करून हा सगळा सराव करून घेणारे आपले क्रीडा शिक्षक त्यांचे बहुमोल मार्गदर्शन तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मिळते. त्या संधीचा लाभ घ्या. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कॉलेजचे नाव चमकेल अशी कामगिरी आपण कराल ही आशा बाळगतो आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो.'' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रात्र महाविद्यालयाचे क्रीडा संचालक शरण वांगी यांनी केले तर आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक विक्रांत विभूते यांनी मानले.
याप्रसंगी संस्थेचे शैक्षणिक सल्लागार डॉ. प्रमोद दर्गोपाटील , कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रसाद कुंटे, वरिष्ठ उपप्राचार्य प्रा.डॉ.सुहास पुजारी, प्रा.डॉ.दत्तकुमार म्हमाणे, प्रा.डॉ.वंदना पुरोहित,प्रा.डॉ. नंदा साठे, प्रा.डॉ. सुहास दहिटणेकर, संतोष पवार राहुल कराडे,वैजनाथ स्वामी यांच्यासह क्रीडा विभागातील नैपुण्य मिळवणारे आणि एनसीसी विभागातून क्रीडा विभागात खेळणारे विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा