आजच्या स्त्रियांनी सावित्रीबाईंचा आदर्श घ्यावा- डॉ. अंजना गायकवाड
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त
' वाचन संकल्प महाराष्ट्राचा ' अंतर्गत लेखक वाचक संवाद उपक्रम
एनएसएस व ग्रंथालय विभाग च्या वतीने आयोजन
सोलापूर:
भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या आहेत. त्यांनी आपल्या विचार कार्यातून समाजासमोर आदर्श निर्माण केलेला आहे. त्यामधील अग्रगण्य नाव म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले होय. भारतीय स्त्रियांच्या सामाजिक गुलामगिरीचे प्रमुख कारण त्यांचे अज्ञान आहे. ते दूर करण्यासाठी शिक्षण हा एकच पर्याय असून स्त्रियांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य जोतिराव व सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानी केले. याचा आदर्श आजच्या स्त्रियांनी घ्यावा. असे विचार सुप्रसिद्ध निवेदिका व कवयित्री डॉ. अंजना गायकवाड यांनी व्यक्त केले.
विशेष व्याख्यानमालेत डॉ. गायकवाड बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. शहानूर शेख होते. तसेच या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी, डॉ. संघप्रकाश दुड्डे, डॉ. शिवाजी मस्के, डॉ. दादासाहेब खांडेकर, ग्रंथपाल डॉ. विजयकुमार मुलीमनी, प्रा. संतोष पवार यांची विशेष उपस्थिती होती. डॉक्टर गायकवाड यांनी आपल्या भाषणामध्ये सावित्रीबाईंच्या जीवनकार्याची मांडणी केली ज्योतीराव फुले यांच्याबरोबर त्यांनी राहून शिक्षणाचे धडे घेतले ज्ञान संपादन केले आणि जोतिरावांप्रमाणेच आपल्या शिक्षणाचा सदुपयोग सामाजिक कार्यासाठी केला. त्यांनी महिलांच्या विविध प्रश्नांसंदर्भात कार्य केले. विधवा विवाह, सती प्रथा अशा विविध प्रश्नांच्या विषयी जनजागृती केली. स्वतः राबवून महिलांच्या उद्धारासाठी प्रचंड कष्ट घेतले त्यामुळे सावित्रीबाई या सर्व महिलांसाठी आदर्श असणाऱ्या व्यक्तिमत्व होत्या. त्यांच्या पाऊलवाटेने आपणही जाऊन शिक्षण घ्यावे उच्चविद्याविभूषित व्हावे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा. अशी भूमिका त्यांनी मांडली. अध्यक्षीय मनोगतात प्रा. शेख यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या जीवनाचा आदर्श घ्यावा. पुस्तकांचे वाचन करावे. असे विचार मांडले.
कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी तर प्रास्ताविक डॉ. अण्णासाहेब साखरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कु. वैष्णवी बिराजदार, सूत्रसंचालन कु. प्रतिक्षा व्हनसुरे तर आभार कु. भाग्यश्री बिराजदार यांनी मांडले. या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा