विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून ध्येय गाठावे - डॉ. अतुल लकडे

 संगमेश्वरचा ७२ वा वार्षिक क्रीडा गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात



संचार प्रतिनिधी- सोलापूर, दि. १५

आजच्या स्पर्धेच्या युगात दैदिप्यमान यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यामधील क्षमतांचा शोध घेवून त्यावर परीश्रम करुन ध्येय गाठावे. क्रीडा ही केवळ स्पर्धा नसून ती शिस्त, समर्पण व आत्मविकासाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशाकडे लक्ष न देता शारीरीक व मानसिक तंदुरुस्तीवरही लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. अतुल लकडे यांनी केले.शनिवारी, संगमेश्वर कॉलेजमध्ये ७२ व्या क्रीडा पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन समिती सदस्य अण्णाराज काडादी हे होते. तसेच संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष  सी. वी. नाडगौडा, शैक्षणिक सल्लागार प्रा. प्रमोद दर्गापाटील, उपप्राचार्य प्रा. पी. एन. कुंटे, संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. गोठे, कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य  सचिन गायकवाड आदी उपस्थित होते. तसेच या समारंभास श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याचे व्हा. चेअरमन सिध्दाराम चाकोते, श्री सिध्देश्वर देवस्थान समिती सदस्य ऍड. आर. एस. पाटील,  विद्या मुलगे, पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

खेलो इंडियासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कांचन चौगुले, शर्वरी वाघमोडे हे (लॉन टेनिस )मधून तर श्रद्धा दिवटे, त्वरित कटके( रायफल शूटिंग), आकृती सोनकुसरे- ज्युनिअर विभाग ( लॉन टेनिस ) यांचा समावेश होता. 

कार्यक्रमाची सुरुवात प्रिया पाटील हिच्या ईशस्तवनाने व संगमेश्वर गीताने झाली.  पाहुण्यांचा परिचय प्रा. लिना खमितकर यांनी करुन दिला.  प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा स्वागत व प्रास्ताविक करताना म्हणाले,  संगमेश्वर महाविद्यालयाने गेल्या ७२ वर्षात शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक विशेषता, क्रीडा क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी केले आहे .राज्यस्तरावरच नव्हे तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले गुणवंत खेळाडू पोहोचले आहेत. 

डॉ. लकडे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचा आणि महाविद्यालयाचा महत्त्वाचा वाटा असतो. आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मिळवायची असेल तर कष्ट करणे आवश्यक आहे, कष्टाला पर्याय नाही. मिळालेल्या यशावर समाधानी न राहता पुढील ध्येय गाठण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तीमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी एनएसएस, एनसीसी व क्रीडा स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभाग नोंदवावा, असेही ते म्हणाले.

यावेळी जिमखाना विभाग अहवाल वाचन व वरिष्ठ विभाग क्रीडा पारितोषिक यादी वाचन डॉ. आनंद चव्हाण यांनी केले. तसेच विक्रांत विभूते यांनी कनिष्ठ विभाग तर प्रा. शरण वांगी यांनी संगमेश्वर रात्र महाविद्यालयाच्या क्रीडा पारितोषिक यादीचे वाचन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडाप्रशिक्षकांचा व यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पुष्पांजली मेत्री, प्रा. कोमल कोंडा, प्रा. संतोष पवार यांनी केले. तर आभार विद्यार्थी प्रतिनिधी जैद शेख यांनी मानले.  याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाविद्यालयाच्यावतीने जे खेळाडू सहभाग नोंदवतात. त्या विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या वतीने प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जाणार असुन विद्यापीठाच्यावतीने 'खेलो इंडिया' अंतर्गत विद्यापीठात 20 कोटीचे मल्टीपर्पज हॉल पूर्णत्वास आले आहे. त्याचे उद्घाटन २१ मे रोजी होणार असल्याचे संकेत यावेळी डॉ. अतुल लकडे यांनी दिले.

...........



(फोटो ओळ - बोलताना मंचावर मा. डॉ. अतुल लकडे, डॉ. आनंद चव्हाण, विद्यार्थी प्रतिनिधी जैद शेख, प्र. प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, शैक्षणिक सल्लागार प्रा.प्रमोद दर्गापाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अण्णाराज काडादी, संस्थेचे उपध्यक्ष प्रा.सी. बी. नाडगौडा, प्राचार्य एस. डी. गोठे, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य  सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के