शाहीर राम जोशी यांच्या आठवणींना उजाळा
मराठी भाषा क्षेत्रभेटी अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद
सोलापूर प्रतिनिधी ( दिनांक २५ जुलै )
साहित्यिकांच्या वारसा स्थळांना भेट देणे म्हणजे केवळ पर्यटन नव्हे, तर ती एक शिक्षणप्रक्रिया आहे. या स्थळांमधून विद्यार्थ्यांना साहित्याची जडणघडण, सांस्कृतिक समृद्धी, भाषेची सजीवता आणि माणूस म्हणून वाढ होण्याचा मार्ग मिळतो. अशा स्थळांची नियमित पाहणी ही शैक्षणिक उपक्रमाचा अविभाज्य भाग व्हावा, अशी गरज निर्माण झाली असल्याने.विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील सांस्कृतिक भांडाराची जाणीव करून दयावे या उद्देशाने संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मराठी साहित्यातील कविराय राम जोशी यांच्या सोलापुरातील निवासस्थानी जाऊन त्यांच्या विषयी माहिती घेण्यात आली. तो संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले. प्रारंभी विद्यार्थ्यांना एकत्रित करून कविराय राम जोशी यांच्या विषयी माहिती देण्यात आली.त्यानंतर प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी जाऊन माहिती घेण्यात आली याप्रसंगी अशोक निम्बर्गी, सायबण्णा निम्बर्गी, दत्तात्रय गुड्डेवाडी, संतोष पवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
सोलापुरातील कविराय राम जोशी यांचे जिथे वास्तव्य होते त्या जुन्या विठ्ठल मंदिराच्या ठिकाणी भेट देऊन त्यांच्या साहित्यकृती विषयी आणि त्यांच्या जीवन चरित्राविषयी जाणून घेतले त्यातून त्यांच्या प्रेरणादायी चरित्राचे आकलन विद्यार्थ्यांना झाले.नागेश जोशी, किरण जोशी आणि अनंतराव जोशी आदींनी शाहीर राम जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला.किंवा लोकशाहीर राम जोशी यांच्या जीवनातील प्रसंग ऐकताना विद्यार्थी रमून गेले होते.
याप्रसंगी बोलताना अशोक निम्बर्गी म्हणाले ,'' साहित्यिक हे केवळ शब्दांचे शिल्पकार नसतात, तर ते काळाचे साक्षीदार, समाजाचे आरसे आणि संस्कृतीचे संवाहक असतात. त्यांच्या जीवनातील विविध टप्पे, कार्यक्षेत्रे आणि वास्तव्य केलेली ठिकाणे म्हणजेच त्यांची वारसा स्थळे, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थाने ठरू शकतात. अशा स्थळांना भेट देणे म्हणजे इतिहास, साहित्य आणि संस्कृती यांचा अनुभव घेणे होय.''
जीवनतत्त्वांचा थेट अनुभव येतो.
साहित्यिकांच्या जन्मस्थळे, निवासस्थाने, लेखनस्थळे किंवा त्यांचे स्मारक हे त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या पैलूंचे द्योतक असतात. उदाहरणार्थ, पुण्यातील ज्ञानेश्वर मंदिर, महेश्वर (म.प्र.) येथील कवी मूकुंदराजांचे ध्यानस्थळ, कोल्हापूरमधील व.पु. काळेंचे घर, यांना भेट देताना त्या साहित्यिकांच्या जीवनप्रवासाची अनुभूती येते. हे स्थळ म्हणजे शब्दांपलीकडची जगण्याची शिकवण असते.
साहित्य आणि इतिहास यांची सांगड घालता येते साहित्यिकांचे वास्तव्य असलेली ठिकाणे हे त्या काळाचे, समाजाचे व सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार असतात. उदा. मिरजेतील वि.स. खांडेकर यांचे निवासस्थान किंवा नागपूरमधील वामन मल्हार जोशींचे घर – या ठिकाणी गेल्यावर विद्यार्थ्यांना त्या काळातील सामाजिक चळवळी, मूल्यप्रणाली आणि साहित्यिक दृष्टीकोन समजतो. त्यामुळे इतिहासाची शिकवण जिवंत व अर्थपूर्ण होते.
भाषिक व सांस्कृतिक आत्मभान येते. साहित्यिक वारसा स्थळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेचे, भाषिक परंपरेचे आणि स्थानिकतेचे भान देतात. ही स्थळे म्हणजे एक प्रकारची "संवेदनशील शिक्षण प्रयोगशाळा" आहेत. उदा. संत नामदेवांचे पंढरपुरातील नामदेव पायरी असो किंवा मंगळवेढ्यातील संत कान्होपात्रा यांचे मंदिर असो तत्कालीन परिस्थिती आणि ऐतिहासिक काळ विद्यार्थ्यांना अनुभवता येतो. बहिणाबाई चौधरी यांचे घर पाहताना त्या ग्रामीण जीवनाशी किती घट्ट जोडल्या होत्या, हे लक्षात येते आणि विद्यार्थ्यांना मराठी ग्रामीण साहित्याची जाण मिळते.
चौकट - शिक्षणात नवोपक्रम व स्थलभेटी
शालेय अभ्यासक्रमात ‘स्थलभेटी’ किंवा ‘साहित्य सहली’चा समावेश केल्यास विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उत्सुकता वाढते. ग्रंथालय, संग्रहालये, स्मारके, साहित्य संमेलन स्थळे या स्थळांना भेट दिल्याने अध्ययन अनुभव विविध आणि बहुआयामी बनतो. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमापलीकडचे साहित्य समजते. अश्या उपक्रमांमुळे सामाजिक जाणीवा निर्माण होतात व मूल्यशिक्षण आपोआप घडते जाते.साहित्यिक वारसा स्थळांमध्ये अनेकदा त्यांची सामाजिक बांधिलकी, संघर्ष आणि मूल्ये अधोरेखित होतात. रॅम जोशींचा श्रमिक वर्गाशी असलेला संबंध किंवा त्यांच्या जीवनातला संघर्ष विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेबद्दलची जाण आणि सहवेदना निर्माण करतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा