इयत्ता ११ वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे संगमेश्वर कॉलेजमध्ये स्वागत
कॉलेजच्या उपक्रमात सहभागी होताना खेळ आणि अभ्यास दोन्ही महत्वाचे
- उपप्राचार्य प्रसाद कुंटे
सोलापूर ( दिनांक २८ जुलै ) " विद्यार्थ्यांनोआजपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात आपणा सर्वांचे स्वागत कॉलेजची क्रीडा आणि शैक्षणिक परंपरा ही दैदिप्यमान आहे. त्या परंपरेचे आपण सहप्रवासी झाला आहात त्या परंपरेला शोभेल असे कार्य तुमच्या हातून घडो हातून घडो. कला,क्रीडा, साहित्य, संगीत या वैविध्यपूर्ण उपक्रमात नैपुण्य मिळवा. आपले उज्वल भविष्य साकार करण्यासाठी संगमेश्वर मधील विविध व्यासपीठांचा वापर करा.कॉलेजच्या उपक्रमात सहभागी होताना खेळ आणि अभ्यास दोन्ही महत्वाचे आहेत ''असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी केले. ते कला आणि वाणिज्य शाखेच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात बोलत होते. मंचावर पर्यवेक्षक डॉ.मल्लिनाथ साखरे, कला शाखा समन्वयक शिवशरण दुलंगे, वाणिज्य शाखा समन्वयक बाबासाहेब सगर,प्रा.अशोक निंबर्गी उपस्थित होते.
प्रारंभी संगमेश्वर गीत झाले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाले. प्रास्ताविकानंतर उपप्राचार्यांचा सत्कार झाला . त्यानंतर चित्रफितीच्या कोमल कोंडा (कला शाखा ) यांनी कॉलेजच्या विविध उपक्रमांची माहिती विभागनिहाय दिली . त्यानंतर विषयनिहाय शिक्षकांनी आपला परिचय करून दिला. प्रातिनिधिक स्वरूपात दहावीत घवघवीत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कॉलेजच्या वतीने करण्यात आला.त्यानंतर उपप्राचार्यांचे मार्गदर्शन झाले.
प्रा.अशोक निंबर्गी कला शाखा ही मानववंशशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य, भाषा, राजकारण, तत्वज्ञान इ. विषयांची शाखा आहे.असे सांगताना पुढे म्हणाले की,'' ही शाखा विद्यार्थ्यांच्या विश्लेषणात्मक विचारशक्ती, संवादकौशल्य, लेखनशैली, आणि सामाजिक जाणिवा वाढवते. कला शाखा – या शब्दाचा उच्चार होताच अनेकांच्या मनात एक गैरसमज उभा राहतो – की ही शाखा फक्त कमी गुण मिळवलेल्यांची असते! पण सत्य हे आहे की, कला शाखा ही माणूस घडवणारी, समाज घडवणारी आणि संस्कृती जपणारी सर्वात मौल्यवान शाखा आहे.कला शाखेतील विषय जसे की इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान, साहित्य – हे आपल्याला समाज, माणूस आणि जीवन समजून घेण्याची दृष्टी देतात. ही शाखा आपल्याला फक्त नोकरीसाठी नाही, तर चांगला नागरिक, संवेदनशील व्यक्ती आणि विचारशील नेता बनवते.या शाखेचा विद्यार्थी उत्तम लेखक, पत्रकार, वकील, शिक्षक, कार्यकर्ता, कलाकार किंवा प्रशासक बनतो. कला शाखेतीलच विद्यार्थी सामाजिक परिवर्तनाचे खरे नेतृत्व करतात. साहित्य, संगीत, नाट्य, चित्रकला, फोटोग्राफी यांसारख्या सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो लोकांचे मूळ हे याच शाखेत आहे. समाजात आनंद, सौंदर्य आणि विचार जागवण्याचे काम कला शाखेचे विद्यार्थीच करतात.
आज जेव्हा आपण आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगतो, लोकशाही टिकवतो, किंवा मानवी मूल्यांवर आधारित विचार करतो – तेव्हा त्या पाठीमागे कला शाखेतील शिक्षणाचं बळ असतं.म्हणूनच कला शाखा ही दुय्यम नसून, ती अत्यावश्यक आहे. आज जगाला फक्त तंत्रज्ञान नव्हे, तर माणूसपणा, समजूतदारी आणि मूल्यांचीही गरज आहे – आणि ती कला शाखा आपल्याला देते.म्हणून अभिमानाने सांगा – मी कला शाखेचा विद्यार्थी आहे'' !
उपप्राचार्य प्रसाद कुंटे पुढे म्हणाले की, ''कॉलेज जीवन म्हणजे केवळ पुस्तकात डोकं खुपसून अभ्यास करायचा काळ नाही, तर तो आहे एक सर्वांगीण विकासाचा टप्पा – जिथे मैत्री जुळते, आत्मविश्वास वाढतो, आणि जीवनाचे खरे अर्थ समजायला सुरुवात होते.कला शाखा म्हणजे विचारांची मोकळीक, भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आणि सर्जनशीलतेचा उत्सव.इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, भाषा, साहित्य यांचा अभ्यास करताना आपण केवळ अभ्यास करत नाही, तर समाज आणि स्वतःला समजून घेण्याची एक नवी नजर मिळवतो.कला आणि वाणिज्य शाखेतील कॉलेज जीवन हे केवळ शैक्षणिकच नाही, तर मानसिक, सामाजिक, आणि व्यावसायिक दृष्टिकोनातूनही खूप समृद्ध करणारे असते.''
डॉ. मल्लिनाथ साखरे बोलताना मौलिक सूचना देत म्हणाले,'' अकरावी-बारावीचे दोन वर्षे तुमच्या आयुष्याला दिशा देतात. त्यामुळे भावनांवर नाही, तर माहिती व विचारांवर आधारित निर्णय घ्यावे लागते. योग्य कॉलेज, योग्य विषय आणि योग्य वातावरण – हे तिन्ही मिळाले तरच तुमचे शिक्षण यशस्वी ठरते,आमचे सहप्रवासी आपण झाले आहात आपले स्वागत ''
कला शाखेचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुड्डेवाडी यांनी केले, तर वाणिज्य शाखेचे तेजश्री तळे यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या नावाचे यादी वाचन संगीता म्हमाणे आणि रश्मी कन्नूरकर यांनी केले.आभार शिवराज देसाई आणि वाणिज्य शाखेचे आभार बाबासाहेब सगर यांनी मानले. याप्रसंगी कला, वाणिज्य विभागातील बहुसंख्य विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा