ग्रंथालयातील ग्रंथधन जीवनाचा मार्ग दाखवते - प्रा.डॉ.सुहास पुजारी
भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांचा जन्मदिन
सोलापूर प्रतिनिधी -
'' ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचा खजिना. त्यातील प्रत्येक ग्रंथ हे वाचकाला मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहे.धार्मिक, तत्त्वज्ञान, साहित्य, विज्ञान, इतिहास, कला इत्यादी प्रत्येक क्षेत्रातील पुस्तकांमुळे माणूस आपले विचार घडवू शकतो, समस्यांचे निराकरण शोधू शकतो, तसेच आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरणा घेऊ शकतो. ग्रंथालयातील ग्रंथधन माणसाला अंधारातून प्रकाशाकडे नेते, चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणते. त्यामुळे ग्रंथालय हे केवळ शिक्षणापुरतेच नव्हे तर सद्विचार, सद्गुण आणि संस्कारांचेही केंद्र आहे. विद्यार्थ्याला अभ्यासासाठी संदर्भग्रंथ वाचून करिअरचा योग्य मार्ग सापडतो.साहित्य वाचून मनुष्य संवेदनशील, विचारशील व सुसंस्कृत होतो.चरित्रग्रंथ वाचून जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळते.म्हणूनच, ग्रंथालयातील ग्रंथधन हे केवळ माहितीचा साठा नसून मानवाच्या जीवनप्रवासाला दिशा दाखवणारे मार्गदर्शक आहे.'' असे मौलिक विचार कला विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. सुहास पुजारी यांनी व्यक्त केले. ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनी संगमेश्वर कॉलेजच्या ग्रंथालय इमारतीत बोलत होते. याप्रसंगी समन्वयक प्रा.डॉ.राजकुमार खिलारे, ग्रंथपाल डॉ. विजयकुमार मुलीमनी,सहाय्यक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी, रात्र महाविद्यालयाचे ग्रंथपाल गणेश फंड आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.ग्रंथपाल डॉ. विजयकुमार मुलीमनी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्रास्ताविकात संगमेश्वर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाचा आढावा घेतला. उपलब्ध ग्रंथांचा वापर विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन केले . त्यानंतर उपलब्ध वेळेत प्रा.डॉ.सुहास पुजारी यांनी दिलखुलास संवाद साधला. संतोष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी संतोष पवार,कोमल कोंडा, ग्रंथालयातील कर्मचारी श्रीशैल हुंडेकरी,राजेंद्र घुगे, रेवप्पा कोळी,संजय कुंभार,नागेश कामाणे आणि कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
एस. आर. रंगनाथन ( Shiyali Ramamrita Ranganathan ) यांना भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक (Father of Library Science in India) म्हटले जाते. ते एक सुप्रसिद्ध गणितज्ञ, ग्रंथपाल आणि ग्रंथालय विज्ञानातील शास्त्रज्ञ होते.
जीवनपरिचय जन्म : १२ ऑगस्ट १८९२, शियाली, तमिळनाडू, भारत मृत्यू : २७ सप्टेंबर १९७२ ते मूळचे गणिताचे प्राध्यापक होते, पण नंतर त्यांनी आपले जीवन ग्रंथालय विज्ञानासाठी वाहून घेतले.
कार्य व योगदान : पाच ग्रंथालय नियम (Five Laws of Library Science – 1931) * पुस्तके वापरण्यासाठी आहेत. प्रत्येक वाचकाला त्याचे पुस्तक मिळाले पाहिजे. प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. वाचकाचा वेळ वाया जाऊ नये. ग्रंथालय हे सतत वाढणारे सजीव आहे . हे नियम आजही जगभरातील ग्रंथालयशास्त्रात महत्वाचे मानले जातात.
कॉलन वर्गीकरण पद्धती (Colon Classification – 1933) त्यांनी अत्यंत वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध अशी "कॉलन वर्गीकरण पद्धती" तयार केली. ही पद्धत विषयांची बारकाईने विभागणी करण्यास उपयुक्त ठरली आणि अनेक देशांमध्ये वापरली जाते.
ग्रंथालय चळवळ भारतात सार्वजनिक ग्रंथालयांची उभारणी, प्रगती आणि जागरूकता यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. ते इंडियन लायब्ररी असोसिएशन (Indian Library Association) चे पहिले अध्यक्ष होते.
लेखनकार्य त्यांनी ६० पेक्षा अधिक पुस्तके आणि २,००० हून अधिक लेख लिहिले. प्रमुख पुस्तके : Five Laws of Library Science, Prolegomena to Library Classification Colon Classification, Library Manual
सन्मान : त्यांना १९५७ मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे कार्य मान्य झाले असून त्यांना "Library Science चा पितामह" म्हटले जाते. म्हणूनच, डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी भारतातच नव्हे तर जगातही ग्रंथालयशास्त्राला वैज्ञानिक पायाभूत रचना दिली.
पाच ग्रंथालय नियमांचे सोप्या उदाहरणांसह स्पष्टीकरण
१. Books are for use (पुस्तके वापरण्यासाठी आहेत) पुस्तक कपाटात बंद करून ठेवण्यासाठी नसते, तर वाचकांनी वापरावे म्हणून असते. उदाहरण : शाळेत विज्ञानाचा तास असल्यावर विद्यार्थी प्रयोगांची माहिती घेण्यासाठी ग्रंथालयातून पुस्तक काढतो.
२. Every reader his book (प्रत्येक वाचकाला त्याचे पुस्तक मिळाले पाहिजे) प्रत्येक वाचकाला त्याच्या गरजेनुसार पुस्तक उपलब्ध झाले पाहिजे. उदाहरण : एका विद्यार्थ्याला कथा-पुस्तक हवे आहे, तर दुसऱ्याला स्पर्धा परीक्षेसाठी संदर्भ पुस्तक. दोघांनाही त्यांची हवी असलेली पुस्तके मिळायला हवीत.
३. Every book its reader (प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे) प्रत्येक पुस्तकात काहीतरी माहिती असते, आणि ती माहिती कोणाला तरी उपयुक्त ठरते. उदाहरण : वैद्यकीय शास्त्राचे पुस्तक सामान्य वाचकासाठी नसेल, पण डॉक्टर किंवा संशोधकासाठी खूप मौल्यवान ठरते.
४. Save the time of the reader (वाचकाचा वेळ वाया जाऊ नये) वाचकाला पटकन हवी ती माहिती मिळाली पाहिजे. उदाहरण : ग्रंथालयात संगणकीकृत शोध व्यवस्था (OPAC – Online Public Access Catalogue) असल्यास विद्यार्थी लगेच पुस्तक शोधू शकतो.
५. The library is a growing organism (ग्रंथालय हे सतत वाढणारे सजीव आहे)समाजाच्या आणि वाचकांच्या गरजेनुसार ग्रंथालयात सतत नवीन पुस्तके, तंत्रज्ञान, व सुविधा जोडल्या गेल्या पाहिजेत. उदाहरण : आधी फक्त छापील पुस्तके असलेले ग्रंथालय नंतर ई-बुक्स, ऑडिओबुक्स, ऑनलाइन जर्नल्स अशा स्वरूपात विस्तारले.
या कार्यक्रमानंतर ग्रंथालय भेटीचे नियोजन मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता अकरावी बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी ग्रंथालयातील वेगवेगळ्या विभागांची माहिती करून घेतली. याप्रसंगी सहाय्यक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी यांनी संपूर्ण ग्रंथालयाचे माहिती सविस्तर दिली. या उपक्रमात अशोक निम्बर्गी, सायबण्णा निम्बर्गी, दत्तात्रय गुड्डेवाडी उपस्थित होते.













टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा