स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वाणिज्य शाखेच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन


सोलापूर प्रतिनिधी - 

भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातील वाणिज्य व्यवहाराचे ज्ञान वाढीस लागावे. आधुनिक तंत्राची स्थित्यंतरे कोणती ? या बाबी समजावून घेत असताना बँकिंग प्रणाली पैशाचा पैशाचे महत्व, अर्थकारण, त्यावरील अवलंबित असलेले समाजातील घटक असे विषय घेऊन अभिनव रांगोळी स्पर्धेचे आयोजन वरिष्ठ विभागाच्या वाणिज्य शाखेने केले होते. यामध्ये पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मुलींसोबत सोबत विद्यार्थ्यांनी देखील सुबक अशी रांगोळी रेखाटली होती.यामध्ये सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमातील कंगोऱ्यांसह, वाणिज्य शाखेतील व्यावहारिक बदल दाखवण्यात आले, त्यात डिजिटल पे , फोन पे यापासून डिजिटल व्यवहार कसा केला जातो .अर्थकारण ,समाजकारण, भारतीय शेती यांची सांगड घालून ही रांगोळी चित्रे रेखाटण्यात आली होती.दालनाचे उद्घाटन उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास पुजारी यांचे हस्ते झाले.प्रा. डॉ.वंदना पुरोहित, प्रा.डॉ. राजकुमार खिलारे यांच्यासह वाणिज्य शाखेतील प्राध्यापक उपस्थित होते.

स्पर्धेचे परीक्षण कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाच्या प्रा.मीनाक्षी रामपुरे आणि प्रा.डॉ. मंजू संगेपाग यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.पार्वती शेटे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ. राजकुमार खिलारे यांनी केले. यशस्वीतेसाठी  प्रा.लता विटकर, प्रा. शरयू भिसे, प्रा.पार्वती शेटे, ॲड. डॉ. वैशाली अचकनळ्ळी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

      याप्रसंगी संवाद साधताना उपप्राचार्य प्रा. डॉ.सुहास पुजारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते या शब्दात'' ५० च्या आसपास विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे रंग व्यक्त केले आहेत. उत्तम अशा प्रकारचं आपलं कौशल्य त्यांनी इथे सिद्ध केले आहे. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना आपण केवळ क्लासरूम मध्ये शिकत नसतो, तर महाविद्यालयातला प्रत्येक कोपरा प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवत असते. कारण महाविद्यालयामध्ये निरंतर शिक्षण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये चालू असते. संगमेश्वर महाविद्यालय तर त्यासाठी स्वतंत्र लौकिक असलेले असे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम होतात.असे वेगवेगळे उपक्रम जे विद्यार्थ्यांना आनंद देतात आणि विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सर्जनशीलतेला देखील वाव देतात. प्रत्येकाला काहीतरी सांगायचं असतं, कुठेतरी प्रकट व्हायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं, आपली कला कुणीतरी पहावं असं त्याला वाटत असतं आणि त्यासाठी प्रत्येक विद्यार्थी उत्सुक असतो. त्या उत्सुकतेला खतपाणी घालण्याचा कार्य वेगवेगळ्या विभागांनी करायचं असतं. कॉलेजच्या वेगवेगळ्या विद्याशाखांनी करायचं असत.ते कार्य या वाणिज्य विद्याशाखेने उत्तम रीतीने चालवलं केलंय. याचा आनंद मी व्यक्त करतो. आज इथं ज्या विद्यार्थ्यांनी-  विद्यार्थिनींनी या रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.  तुम्ही कला - कौशल्य  प्रकट केले नाही तर तुम्ही शिकत असलेल्या विषयाला देखील तुम्ही तिथे सादर केल्याच्या कलेच्या माध्यमातून व्यक्त होत आहात. हे सृजनशीलतेचे,कलासक्त व्यक्तीचे प्रतिक आहे. 

विद्यार्थिनींनी नुसतं रेषा प्रकट केल्या नाहीत तर ते शिकत असलेल्या विषयाला देखील तिथे सादर केले आहे.रांगोळी हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे, लक्षात घ्या. प्राचीन काळापासून चालत आलेली ही  समृद्ध अशी आपली संस्कृती आहे. भारताच्या  रांगोळीला देखील एक दीर्घ परंपरा आहे ती अनेक ग्रंथातून प्रकट झाली आहे . तुम्ही वाचला की नाही मला माहित नाही. रांगोळी विषयीची वेगवेगळी पुस्तक आहेत. वेगवेगळ्या प्रकाशन संस्थेच्या. रांगोळीचा इतिहास सांगणारी, रांगोळी मधले कलावंत कोण ? अस्सल कलावंत यांनी काय वेगळं केलं त्याचा परिचय करून देणारी पुस्तक आहेत. रांगोळीमध्ये येणारी वेगवेगळी चिन्ह त्याचा अर्थ हे सगळं त्या पुस्तकांमधून येतात. हे सगळं भारतीय संस्कृतीच प्रतीक असणारी चिन्ह बाजूला ठेवून डिजिटल संस्कृतीतले आधुनिक चिन्ह तुम्ही इथे दाखवली त्याचं मला कौतुक वाटतय, कारण जगाप्रमाणे बदललं पाहिजे . 

भारतीय संस्कृतीचा अभिमान आपल्याला आहेच. तो असावाच. कारण ती आपल्या देशाची संस्कृती आहे, पण तो अभिमान जतन करत असतानाच नव्याचं देखील आपण स्वागत केलं पाहिजे .नवा विचार देखील कलेच्या माध्यमातून मांडला पाहिजे. तो मला या सगळ्या रांगोळ्यांमधून दिसला.दोन बाय दोन च्या त्या चौरसामध्ये तुम्ही जे व्यक्त झालात हे अतिशय सुंदर आहे. अतिशय कलात्मक आहे. मी सगळ्या आयोजन करणाऱ्या प्राध्यापकांचे देखील त्यासाठी कौतुक करतो.. रांगोळी घालताना पाहूण नावाची एक मराठी मध्ये फार सुंदर कविता आहे. मला असं हे काहीतरी पाहिलं की आम्हाला आमच्या साहित्याच्या क्षेत्रातला गोष्टी आठवत राहतात .केशवसुतांची कविता केशवसुत म्हणजे मराठी कवितेचे जनक.  त्यांनी रांगोळी घालताना पाहूण नावाची उत्तम कविता लिहिलेली आहे सहधर्मचारीणी जी असते. म्हणजे पत्नी ही  आपल्या दारात रांगोळीत वेगवेगळे चिन्ह काढते. शंख ,चक्र, पद्म, गदा वगैरे अशी चिन्हे काढते. स्वस्तिक काढते, ओम काढते, म्हणजे गाईची पावलं, गो पद्म हे शुभ मानले गेले आहे आपल्याकडे.   कवितेमध्ये असा संदर्भ आलाय ज्या दारात रांगोळी असते त्या घरात हरीचा वास असतो. हरी म्हणजे परमेश्वर. परमेश्वर तिथे त्या घरात नांदतो अशी कवीची कल्पना आहे. अतिशय सुंदर अशी कविता आहे.


रांगोळी घालतांना पाहून

(साहित्यिक: केशवसुत)

होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,  

बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;  

तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;  

रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.


आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,  

मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;  

पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,  

देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.


होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काही तरी,  

गेला दाटुनी शांत तो रस अहा तेणे मदभ्यंतरी;  

तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना,  

अंतर्दृष्टिपुढूनिया सरकल्या, संतोष झाला मना!


चित्रे मी अवलोकिली रुचिर जी, काव्ये तशी चांगली,  

त्यांही देखिल न स्मरेच इतुकी मद्वृत्ति आनंदली;  

लीलेने स्वकरे परंतु चतुरे! तू काढिल्या आकृती,  

त्या या पाहुनि रंगली अतिशये आहे मदीया मति.


रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये! मला वाटतो,  

स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात, चित्रात तो;  

स्वर्भूसंग असा तयात इतुक्या अल्पावकाशी नसे  

कोणी दाखविला अजून सुभगे! जो साधिला तू असे.


आदित्यादिक आकृती सुचविती दिव्यत्व ते उज्ज्वल,  

तैसे स्वस्तिक सूचवी सफलता धर्मार्थकामांतिल;  

पावित्र्याप्रत गोष्पदे, तुळसही, शोभेस ही सारसे,  

पुष्पे प्रीतिस, चक्र हे सुचविते द्वारी हरी या असे!


तत्त्वे मंगल सर्वही विहरती स्वर्गी तुझ्या या अये!  

आर्ये! तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वये.  

नाते, स्नेह, निदान ओळख जरी येथे मला आणिती,  

होतो मी तर पाद सेवुनी तुझे रम्य स्थळी या कृती!


चित्ती किल्मिष ज्याचिया वसतसे ऐशा जनालागुनी  

या चिन्हांतुनि हा निषेध निघतो आहे गमे मन्मनी-  

"जा मागे अपुल्या, न दृष्टि कर या द्वाराकडे वाकडी,  

पापेच्छूवरि हे सुदर्शन पहा आणिल की साकडी!"


"आहे निर्मल काय अन्तर तुझे? मांगल्य की जाणसी?  

लोभक्षोभजये उदात्त हृदयी व्हायास का इच्छिसी?  

ये येथे तर, या शुभाकृति मनी घे साच अभ्यासुनी."  

आर्ये स्वागत हे निघे सरळ या त्वल्लेखनापासुनी.


साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,  

नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!  

रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,  

कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!

ही कविता केशवसुतांची एक उत्कृष्ट कलात्मक अभिव्यक्ती आहे, जिथे रांगोळीची साधी क्रिया आत्मज्ञान, आध्यात्मिकता आणि सौंदर्य या सर्वांपुरती वाढवते. त्यात वर्णन केलेला रांगोळी रेखाटनाचा अनुभव आणि त्यात दडलेला भावनेचा रंग पाहता, कवितेतील शब्द आणि दृश्यं मनाला गारुड घालतात

          या कवितेत शेवटची एक ओळ आहे. ती तुम्हाला सांगाविशी वाटते साध्या ही विषयात कधी  किती आशय ही किती मोठा आढळतो. रांगोळीचा विषय अतिशय साधा असतो, पण त्यातून सुचवलेला विचार खूप मोठा असतो. एखाद्या रांगोळीचा उल्लेख घरी आलेला पाहुणा दिवाणखान्यात जेव्हा करतो तेव्हा त्या घरातले घरपण आपल्याला लक्षात आणून देत असतो.आलेल्या पाहुण्याची ती कलात्मक दृष्टी रांगोळी घालणाऱ्याचा हुरूप वाढवते आणि त्यांचा आनंद द्विगुणित होत असतो. थोडक्यात काय कलात्मक दृष्टी आपल्याकडे असली की नक्कीच आपण त्या गोष्टींना स्पर्श करत असतो. ही कलात्मक दृष्टी आपल्यात निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवला गेलाय असं मला वाटतं.

 









































































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी