‘ राष्ट्रीय अवकाश दिन ’ उत्साहात - पोस्टर प्रदर्शन स्पर्धा संपन्न
विविध क्षेत्रांतील वैज्ञानिक संशोधनामुळे
राष्ट्र आत्मनिर्भरतेकडे – प्रा.व्यंकटेश गंभीर
सोलापूर (वार्ताहर): भारताच्या अंतराळ संशोधन इतिहासातील सुवर्णक्षणाची नोंद ठेवत २३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अवकाश दिन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले आणि भारत जगातील पहिला देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जाणार आहे. संगमेश्वर कॉलेजमध्येही राष्ट्रीय अवकाश दिन उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने पोस्टर प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
“आजच्या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञान हे कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचे मुख्य साधन आहे. भारतासारख्या विशाल देशाला आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी विविध क्षेत्रांतील वैज्ञानिक संशोधन व त्याचा योग्य वापर अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन प्रा. व्यंकटेश गंभीर यांनी केले. ते विज्ञान अध्ययन व आत्मनिर्भरता या विषयावर आयोजित विशेष संवादात बोलत होते.
प्रा. गंभीर यांनी अवकाश तंत्रज्ञान, डिजिटल टेक्नॉलॉजी, हवामान खाते, मत्स्य विभाग, स्पेस टेक्नॉलॉजी या क्षेत्रांतील भारताच्या प्रगतीचा आढावा घेतला. इस्रोने राबवलेल्या चांद्रयान, मंगळयान, गगनयान मोहिमा या मोहिमांचा उल्लेख करून ते म्हणाले की, भारताने स्वदेशी PSLV व GSLV प्रक्षेपक तयार करून केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतर देशांसाठीही उपग्रह प्रक्षेपणाची क्षमता सिद्ध केली आहे. यामुळे भारताचे परकीय तंत्रज्ञानावरचे अवलंबित्व कमी झाले आहे.
डिजिटल इंडिया उपक्रमामुळे ई-गव्हर्नन्स, ऑनलाईन शिक्षण, डिजीटल पेमेंट्स, आरोग्य व बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि 5G तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होत असून भारत डिजिटलदृष्ट्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हवामान खात्याच्या प्रगत यंत्रणांमुळे शेतकऱ्यांना पर्जन्य व चक्रीवादळांची माहिती अचूक मिळते. यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टळते आणि उत्पादनवाढीस मदत होते, असे त्यांनी नमूद केले. मत्स्य व्यवसायाविषयी बोलताना प्रा. गंभीर म्हणाले की, “समुद्र व गोड्या पाण्यातील मत्स्य संपदा ओळखण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. मत्स्यपालनातील आधुनिक पद्धती, कोल्ड स्टोरेज व संशोधनामुळे भारत मत्स्य उत्पादनात आत्मनिर्भर झाला असून परकीय चलनाचीही कमाई वाढली आहे.”
स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर आज केवळ अवकाशपुरता मर्यादित नसून दूरसंचार, नेव्हिगेशन, संरक्षण, हवामान निरीक्षण व नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांत केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्यसेवा आणि प्रशासनासाठी उपग्रहांद्वारे सेवा पोहोचवणे ही आत्मनिर्भरतेची मोठी पायरी असल्याचे ते म्हणाले.
संवादाच्या पुढील टप्प्यात शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र व आरोग्य या घटकांमध्ये विज्ञानाने केलेल्या योगदानाचा त्यांनी ऊहापोह केला. “ऑनलाईन शिक्षण, डिजिटल लायब्ररी, स्मार्ट क्लासरूम यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे ज्ञान मिळत आहे. वैद्यकीय क्षेत्रात रोबोटिक शस्त्रक्रिया, टेलिमेडिसिन, स्वदेशी लसी व औषध संशोधनामुळे भारत औषधनिर्मितीत जागतिक पातळीवर अग्रगण्य ठरला आहे. तसेच रोगनिदानातील आधुनिक साधने व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनामुळे सामान्य नागरिकांना किफायतशीर व दर्जेदार सेवा मिळत आहेत,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी स्वतःचा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबतचा एक अनुभवही सांगितला. डीआरडीओमध्ये काम करत असताना सैनिकांसाठी तयार करण्यात आलेल्या कार्बन-फायबर साहित्याचा वापर करून पंगू मुलांसाठी हलके कॅलिपर्स बनविण्यात आले होते. जुने कॅलिपर्स ४ किलो वजनाचे असताना हे नवे कॅलिपर्स केवळ ४०० ग्रॅमचे होते. ते मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाश्रू पाहून कलाम सर भावूक झाले आणि म्हणाले – “हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई आहे.” या किस्स्याचा उल्लेख करत प्रा. गंभीर यांनी विज्ञानाचा मानवी उपयोग अधोरेखित केला.
कृषी आणि वाणिज्य क्षेत्रातील प्रगतीकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, विज्ञानामुळे शेतकऱ्यांचा हात बळकट झाला असून व्यापाऱ्यांना जागतिक स्पर्धेत टिकून राहणे शक्य झाले आहे. यामुळे भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे.“विज्ञान व तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केल्यास भारत केवळ आत्मनिर्भरच नव्हे तर जगातील अग्रगण्य राष्ट्र बनेल,” अशा ठाम शब्दांत प्रा. व्यंकटेश गंभीर यांनी संवादाचा समारोप केला.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य प्रसाद कुंटे या उपक्रमाविषयी बोलताना म्हणाले,'' भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची जनजागृती करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनामध्ये अवकाश संशोधनातील भारताची प्रगती, चांद्रयान-३ मोहिमेचे यश, उपग्रहांचे महत्त्व, अंतराळ विज्ञानाचा शेती, हवामान, संचार व राष्ट्रीय सुरक्षेतील उपयोग अशा विविध विषयांवर माहितीपर व आकर्षक पोस्टर्स सादर केली जातील.यामधून विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाचा व्यावहारिक उपयोग समजेल, वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट होईल आणि देशाला आत्मनिर्भर बनविण्यात विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित होईल. विज्ञान मंडळाच्या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे मी आवाहन करतो.''
या प्रसंगी विज्ञान समन्वयक प्रा. विशाल जत्ती, प्रा. एस.पी. कुलकर्णी, प्रा. सुषमा पाटील, प्रा. तुकाराम साळुंखे, डॉ. नागेश कोल्हे, विज्ञान मंडळ समन्वयक प्रा. प्रियांका पाटील, प्रा. संतोष पवार,प्रा. रूपाली अंबुलगे, प्रा. पुजारी ,प्रा. सौरभ जाधव,प्रा.संगमेश्वर स्वामी, प्रा. शंकर शितल, प्रा.हत्तळी एम.आर. उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लीना खमितकर यांनी केले, तर आभार प्रा.स्मिता शिंदे यांनी मानले.
पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन इलेक्ट्रॉनिक्स विभागात करण्यात आले होते. याचे परीक्षण प्रा.डॉ.पुष्पांजली मेत्री आणि प्रा.डॉ.कारंडे यांनी केले. निकाल याप्रमाणे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा