ग्रंथ,वाचन,रोजगारावरील प्रश्नांवरून उलगडले ग्रंथालय विश्व
हिंदी कनिष्ठ विभागाचा उपक्रम, विद्यार्थीच बनले मुलाखतकार
सोलापूर प्रतिनिधी
ग्रंथ वाचन आणि रोजगारावरील विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल यांच्या माध्यमातून ग्रंथालय विश्व जाणून घेतले. निमित्त होते संगमेश्वर कॉलेजच्या हिंदी कनिष्ठ विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ' हिंदी और रोजगार ' या विषयावरील मुलाखतीच्या कार्यक्रमाचे.कॉलेजच्या ग्रंथालयाच्या इमारतीत हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम संगमेश्वरगीताने या कार्यक्रमास प्रारंभ झाला.उपस्थित मान्यवरांचे शब्द सुमनाने सूत्रसंचालक सादिया शेख हिने स्वागत केले. प्रज्ञा वाघमारे या विद्यार्थिनीने या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.प्रास्ताविकानंतर सानियाने सर्व सूत्रे हाती घेत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी निमंत्रित केले.
अनुष्का वाघमारे,प्रज्ञा वाघमारे, भाग्यश्री पटवर्धन, भाग्यश्री परदेशी,संदीप आंबेवाले, अथर्व मगदूम, अनुष्का पोळ, मिसबाह शेख,मोहिनी अडकी,गायत्री बुद्धीनी या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. यामध्ये ग्रंथालयाचे कामकाज , ग्रंथालयातून मिळणारी पुस्तके, पुस्तकांचे स्वरूप, प्रशासकीय यंत्रणा या संदर्भात वैविध्यपूर्ण प्रश्न विचारून विद्यार्थ्याने एकूण कामकाजाची माहिती तर घेतलीच सोबतच ग्रंथांचा आपल्या आयुष्यात सहभाग वाढल्यावर आपण आपल्या व्यक्तिमत्वात काय बदल करू शकतो. महत्त्वाचे म्हणजे ग्रंथ विश्वातून किंवा ग्रंथालय क्षेत्रातील रोजगार कोणकोणते आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती प्रमुख मुलाखतदाते डॉ. विजयकुमार मुलीमनी आणि सहाय्यक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी यांनी सविस्तर सांगितले.याप्रसंगी व्यासपीठावर पर्यवेक्षक प्रा. डॉ. मल्लिनाथ साखरे, भाषा समन्वयक प्रा.दत्तात्रय गुडडेवाडी, हिंदी विषयाचे अध्यापक शिवराज पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. विजयकुमार मुलीमनी म्हणाले ,'' ग्रंथालय हे फक्त पुस्तके ठेवण्याचे ठिकाण नाही, तर ज्ञान, माहिती व संस्कृतीचे केंद्र आहे. या क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण घेतल्यास केवळ शासकीय नोकरीच नव्हे तर खासगी व आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतात. त्यामुळे ग्रंथालय विश्व हे उज्ज्वल करिअर घडवणारे क्षेत्र ठरते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट, ई-लायब्ररी, ऑडिओबुक्स, ई-जर्नल्स यामुळे माहिती व्यवस्थापनाचे कौशल्य अत्यंत आवश्यक ठरते. त्यामुळे प्रशिक्षित ग्रंथपाल व माहिती व्यवस्थापकांची मागणी झपाट्याने वाढली आहे.''
ग्रंथालयशास्त्रातील व्यावसायिक अभ्यासक्रम : आजच्या काळात "लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स" हा स्वतंत्र शास्त्र म्हणून विकसित झाला आहे. त्यात डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. अशा विविध अभ्यासक्रमांतून विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतात.
खासगी व सरकारी क्षेत्रातील संधी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन संस्था, प्रयोगशाळा, न्यायालयीन व कायदेशीर ग्रंथालये,वृत्तपत्रे व प्रकाशन संस्था, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रंथालये. इथे विद्यार्थ्यांना रोजगार मिळू शकतो.रोजगाराच्या संधी बाबत बोलायचे झाल्यास ग्रंथालय क्षेत्रात विविध पदांवर रोजगार मिळू शकतो. ग्रंथपाल (Librarian) : शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, खासगी व शासकीय कार्यालये येथे. सहायक ग्रंथपाल / ग्रंथालय सहाय्यक : पुस्तकांचे वर्गीकरण, मांडणी व वाचकांना मदत करणे. माहिती वैज्ञानिक (Information Scientist) : मोठ्या संशोधन संस्था व कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये माहिती व्यवस्थापनाचे कार्य. डिजिटल लायब्रेरियन : ऑनलाईन डेटाबेस, ई-पुस्तके व डिजीटल आर्काइव्ह्ज सांभाळणे. आर्किव्हिस्ट : ऐतिहासिक दस्तऐवज, हस्तलिखिते व दुर्मिळ ग्रंथ जतन करण्याची जबाबदारी. रिसर्च असिस्टंट / डाटा मॅनेजर : विविध संशोधन प्रकल्पांसाठी माहिती गोळा व व्यवस्थापन. अशा अनेक विविध ठिकाणी आपण रोजगार मिळून समृद्ध होऊ शकतो. फक्त आपली इच्छा शक्तीची गरज आहे.''
संतोष कुलकर्णी म्हणाले ,'' ग्रंथालय माणसास समृद्ध करतात,ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार आहे. विविध विषयांवरील पुस्तके, मासिके, संशोधन ग्रंथ, साहित्य यांचा संग्रह तेथे असतो.वाचनामुळे माणसाची बुद्धी, विचारसरणी, दृष्टीकोन व कल्पनाशक्ती विकसित होते.ग्रंथालय हे विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी व सर्वसामान्यांसाठी प्रेरणास्थान ठरते. चांगल्या पुस्तकांच्या सहवासामुळे माणूस चारित्र्यसंपन्न, संस्कारसंपन्न आणि विवेकी होतो. ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तके ठेवण्याचे ठिकाण नसून ते ज्ञान, संस्कृती आणि सभ्यता यांचे जतन करणारे केंद्र आहे.म्हणूनच असे म्हटले जाते की ग्रंथालय माणसास केवळ विद्वानच बनवत नाही तर सर्वांगीण समृद्ध करते ''.
विद्यार्थ्याच्या जीवनात ज्ञानाला सर्वोच्च स्थान आहे. कॉलेज जीवन म्हणजे उच्च शिक्षणाची पायरी. या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी केवळ वर्गात शिकविलेले धडे न शिकता स्वतःच्या अभ्यासाची सवय लावणे आवश्यक असते. अशा वेळी लायब्ररी ही विद्यार्थ्याची खरी सोबती ठरते.लायब्ररीत बसून विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लागते. ही सवय त्यांचे ज्ञानविस्तार करते, विचारशक्ती विकसित करते आणि लेखनकौशल्य वाढवते. त्यामुळे लायब्ररी ही फक्त पुस्तकांचा साठा नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे. कॉलेज जीवनात लायब्ररी ही शिक्षणाचा कणा आहे. ज्ञानसंपादन, स्पर्धात्मक तयारी आणि वैचारिक प्रगल्भता या सर्व गोष्टींसाठी विद्यार्थ्यांनी लायब्ररीचा नियमित वापर करावा.'लायब्ररीशिवाय कॉलेज जीवन अपूर्ण आहे' असे ठामपणे म्हणता येईल.असे सांगत डॉ.मल्लिनाथ साखरे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले. शिवराज पाटील यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी ग्रंथालय विभागातील कर्मचारी श्रीशैल हुंडेकरी,राजेंद्र घुगे, रेवप्पा कोळी,संजय कुंभार,नागेश कामाणे यांनी सहकार्य केले. प्रा.शिवशरण दुलंगे,प्रा.विक्रांत विभुते,प्रा.संतोष पवार यांच्यासह हिंदी विभागातील विद्यार्थी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी क्रीडापटू मोहिनी आडकी हिने सर्वांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा