भाषा आणि साहित्याला मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान प्रा.डॉ.शिवाजीराव देशमुख
संगमेश्वर कॉलेजमध्ये मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन
सोलापूर प्रतिनिधी
'' भाषा आणि साहित्याला मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान असते साहित्यातून सामाजिक संदर्भ अभिव्यक्त होतात.भाषा ही माणसाच्या विचारांची, भावना व्यक्त करण्याची प्रमुख साधने आहे. एखादी कल्पना, भावना, मत इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा आवश्यक असते.साहित्य हे समाजाच्या संस्कृतीचे, परंपरांचे आणि इतिहासाचे प्रतिबिंब असते. एका भाषेतील साहित्य त्या समाजाच्या जीवनपद्धती, मूल्ये आणि संस्कृतीचे दर्शन घडवते.'' प्रा.डॉ.शिवाजीराव देशमुख यांचे प्रतिपादन ते संगमेश्वर कॉलेजच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा होते. याप्रसंगी उपप्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख डॉ. सुहास पुजारी, प्रा.डॉ. सारीपुत्र तुपेरे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधताना डॉ. देशमुख म्हणाले की,''साहित्य माणसाच्या मनात सौंदर्याची जाण निर्माण करते. कविता, कथा, कादंबऱ्या यांतून मानवी अनुभवांचे सखोल आणि सुंदर चित्रण केले जाते, ज्यामुळे वाचक अधिक संवेदनशील बनतो. भाषा आणि साहित्य विचारशक्तीला धार देतात. तर्क, विश्लेषण, आणि कल्पनाशक्ती यांचा विकास साहित्याच्या वाचनातून होतो. साहित्य हे समाजात परिवर्तन घडवण्याचे प्रभावी साधन आहे. लेखक आपल्या लेखनातून अन्याय, विषमता, रूढी-परंपरांविरुद्ध आवाज उठवतो आणि समाजाला विचार करायला लावतो. साहित्य हे कालखंडाचे साक्षीदार असते. एखाद्या काळातील समाजजीवन, राजकारण, अर्थव्यवस्था या गोष्टी साहित्याच्या माध्यमातून समजतात.''
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख डॉ. सुहास पुजारी यांनी केले.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार झाला. सत्कार नंतर प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी मराठीच्या साहित्य परंपरेचा धांडोळा घेतला. संगमेश्वर कॉलेजमधील मराठी विभागाची परंपरा विशद केली. वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थीकेंद्री उपक्रम राबवावेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा. अशी भूमिका मांडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख डॉ. सुहास पुजारी यांनी केले.पाहुण्यांचा परिचय कु. मिनाक्षी बनसोडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन कु. गायत्री मेट्रे यांनी तर आभार गुरुनाथ टेंगळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. संतोष पवार, डॉ. राजकुमार मोहरकर तसेच वाङ्मय मंडळातील विद्यार्थी प्रतिनिधी शिवलीला बनसोडे, प्रज्वला पारखे, जयश्री गुरव, पल्लवी वाघमारे, साक्षी करकंटी, प्राजक्ता वाले, रितू बन्ने, यश कन्नूरकर, स्वप्निल माळी, बुध्ददर्शन चिंचोळीकर, सतीश बिराजदार आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा