प्रामाणिक जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर IIM चे स्वप्न नक्कीच पूर्ण होते. ---ईशान मेरू
भारतीय व्यवस्थापन संस्था इथे निवडीबद्दल संगमेश्वर कॉलेजमध्ये सत्कार
सोलापूर प्रतिनिधी -- ''भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच IIM या भारतातील नामांकित आणि उच्च दर्जाच्या संस्थामध्ये निवड होण्यासाठी प्रामाणिक जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर IIM चे स्वप्न नक्कीच पूर्ण होते''. असे प्रतिपादन संगमेश्वर कॉलेजचा माजी विद्यार्थी क्रीडापटू ईशान वैभव मेरू यांनी केले. भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच IIM मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा कॉलेजच्या वतीने सत्कार संस्थेच्या सचिव प्रा. ज्योती काडादी करण्यात आला. त्याप्रसंगी तो बोलत होता. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्रचार्य प्रसाद कुंटे पर्यवेक्षक डॉ. मल्लिनाथ साखरे, वैभव मेरू, डॉ.राजश्री मेरू आदी उपस्थित होते.
त्याप्रसंगी बोलताना उप्राचार्य प्रसाद कुंटे म्हणाले की '' भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच IIM या भारतातील नामांकित आणि उच्च दर्जाच्या संस्था आहेत. व्यवस्थापनशास्त्र शिकण्यासाठी आणि मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदांवर काम करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की, त्यांनी IIM मध्ये प्रवेश मिळवावा. मात्र या स्वप्नासाठी प्रचंड मेहनत, सातत्य आणि योग्य नियोजन आवश्यक असते''.
सत्कार ला उत्तर देताना ईशानने दिलखुला संवाद साधला तो पुढे म्हणाला, की '' IIM मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सर्वप्रथम CAT परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा खूप कठीण मानली जाते. यात गणित, इंग्रजी वाचन-आकलन, तार्किक विचारशक्ती आणि आकडेवारीवर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गणिताचा पक्का पाया ठेवणे, इंग्रजी भाषेचे ज्ञान वाढवणे आणि तर्कशक्ती वाढवणाऱ्या प्रश्नांचा सराव करणे गरजेचे असते. या तयारीसाठी प्रश्नसंच सोडवणे, मॉक टेस्ट देणे आणि वेळ व्यवस्थापनाचा सराव करणे अत्यंत उपयुक्त ठरते.
CAT परीक्षा पास झाल्यावर पुढील टप्पे म्हणजे गटचर्चा (GD), मुलाखत (PI) आणि लेखन चाचणी (WAT) असतात. गटचर्चेत संवादकौशल्य, विचार स्पष्टपणे मांडण्याची कला व नेतृत्वगुण तपासले जातात. मुलाखतीत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि करिअरविषयीची दृष्टी जाणून घेतली जाते. लेखन चाचणीत मुद्देसूदपणे विचार मांडण्याची क्षमता पाहिली जाते.
IIM मध्ये प्रवेशासाठी केवळ अभ्यास पुरेसा नाही, तर सर्वांगीण विकास आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रे, मासिके वाचून चालू घडामोडींची माहिती ठेवावी. ताण सहन करण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि शिस्तबद्ध वेळ व्यवस्थापन हे गुण विकसित करणेही महत्त्वाचे आहे.''
याप्रसंगी कॉमर्स विभागातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. गौरव जुदगार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा