डॉ.ए.पी.जे.कलाम जन्मदिन - वाचन प्रेरणा दिन उत्साहात
पुस्तकांमुळे मनुष्य जीवन घडते - प्रा.डॉ.श्रीकांत येळेगावकर
सोलापूर दिनांक १५
''मनुष्याचे जीवन हे सतत शिकण्याच्या प्रवृत्तीने विकसित होत असते. या जीवन प्रवासात पुस्तकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. पुस्तक हे केवळ ज्ञानाचे भांडार नाही, तर ते विचारांना दिशा देणारे, मनाला प्रेरणा देणारे आणि आयुष्य घडवणारी साधने आहेत.पुस्तकांमुळे मनुष्याचे जीवन घडते.'' असे प्रतिपादन हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेजमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी आयोजित 'वाचन प्रेरणा दिना'च्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास पुजारी, ग्रंथपाल डॉ. विजय मुलीमनी सहाय्यक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी उपस्थित होते.
प्रारंभी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ.विजय मुलीमनी यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व आधारित केले. त्यानंतर प्रमुख वक्त्यांचा सत्कार करण्यात. सत्कारानंतर डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे चरित्र सांगत सांगत त्यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंगांना उजाळा दिला. व्याख्याननंतर ग्रंथालय विभागाच्या वतीने भरवण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी म्हणाले की,'बालपणी गोष्टींच्या पुस्तकातून आपल्याला चांगले वाईट ओळखायला शिकवले जाते. तारुण्यात प्रेरणादायी ग्रंथ आपल्यात उत्साह निर्माण करतात, तर आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात ग्रंथ आपल्याला शांततेचा, समाधानाचा मार्ग दाखवतात. अशा प्रकारे पुस्तक माणसाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच्या विचारांची जडण घडण करत असतात.
पुस्तके आपल्या मनातील कल्पनाशक्तीला चालना देतात. ती आपल्याला आपल्या मर्यादेपलीकडे नेऊन नवीन जग दाखवतात. इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य अशा सर्व क्षेत्रांतली पुस्तके आपल्याला विचारांची खोली आणि व्यापकता देतात. त्यामुळे मन संकुचित न राहता विस्तृत होते आणि जीवनाला सुंदर कलाटणी मिळते.''
याप्रसंगी प्रा.संतोष पवार, रात्र महाविद्यालयाचे ग्रंथपाल गणेश फंड, ग्रंथालयातील कर्मचारी डॉ.रेवप्पा कोळी,संजय कुंभार, मनोज गोरे, राजू घुगे आणि विद्यार्थी उपस्थित होते सहायक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.
डॉ.श्रीकांत येळेगावकर पुढे म्हणाले. ''पुस्तके ही ज्ञान, प्रेरणा आणि संस्कारांची अखंड शिदोरी आहेत. पुस्तक वाचणारा माणूस कधीच एकटा नसतो, कारण त्याच्या सभोवताली विचारांची संपत्ती असते. म्हणूनच वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी ठरवूया दररोज थोडे तरी वाचूया, स्वतःला घडवूयाआणि समाज उन्नतीकडे नेऊयात ''.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा