‘हिंदी दिवस’ निबंध स्पर्धेत आयेशा नासिर सय्यद प्रथम
सोलापूर- दिनांक १४ प्रतिनिधी
भारत हा विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध असा देश आहे. येथे प्रत्येक राज्याची आपली एक स्वतंत्र भाषा आहे. तथापि, राष्ट्राला एकत्र आणणारी आणि संवादाची सुलभ साधने निर्माण करणारी भाषा म्हणून हिंदीची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. या भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी १४ सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो.
हिंदी दिवसानिमित्त संगमेश्वर कॉलेज हिंदी कनिष्ठ विभाग आयोजित निबंध स्पर्धेमध्ये आयेशा नासिर सय्यद हिने प्रथम यरण्याचा मन मिळवला. पुढील निकाल याप्रमाणे --- सायली दीपक शिरसाठ -द्वितीय, प्रज्ञा दिनकर वाघमारे- तृतीय ,मनोरमा सुरज कांबळे - उत्तेजनार्थ, किरण इस्माईल नदाफ- उत्तेजनार्थ, सादिया हाजीमलंग शेख - उत्तेजनार्थ.परीक्षक म्हणून हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.संघप्रकाश दुड्डे यांनी सहकार्य केले.
स्पर्धा सुरु होण्यापूर्वी प्रा. शिवराज पाटील यांनी हिंदी भाषेचे महत्त्व विषद केले, ते म्हणाले की,'' १४ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेने हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली. त्याच दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी हिंदी दिवस पाळला जातो. देवनागरी लिपीत लिहिली जाणारी हिंदी ही आज जगातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती केवळ भारतातच नव्हे, तर नेपाळ, फिजी, मॉरिशस, सुरिनाम अशा अनेक देशांमध्येही बोलली जाते.
हिंदी दिवस साजरा करण्यामागे मुख्य उद्देश हा आहे की जनतेमध्ये या भाषेबद्दल जागरूकता वाढावी, सर्वसामान्यांनी ती अभिमानाने वापरावी आणि विविध क्षेत्रांत हिंदीचा प्रचार–प्रसार व्हावा. सरकारी कामकाजात तसेच शैक्षणिक व सामाजिक जीवनात हिंदीचा वापर अधिकाधिक वाढावा, हाच या दिनाचा हेतू आहे.
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीचे महत्त्व मान्यच आहे; परंतु मातृभाषेसोबतच राष्ट्रीय भाषेचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हिंदी ही भारतीय एकतेचे प्रतीक आहे. दक्षिणोत्तर, पूर्व–पश्चिम भारतातील लोकांना एकमेकांशी जोडणारा दुवा म्हणून हिंदीची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.
हिंदी ही आपल्या राष्ट्राची अभिमानाची भाषा आहे. भाषेच्या माध्यमातून एकता प्रस्थापित करणे हेच हिंदी दिवसाचे खरे उद्दिष्ट आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने हिंदीचा सन्मान राखावा, तिचा प्रचार करावा आणि तिला दैनंदिन जीवनात स्थान द्यावे. असे झाल्यासच ‘हिंदी दिवस’ साजरा करण्यास खरे महत्त्व प्राप्त होईल''.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा