स्पर्धा परीक्षेत नियोजबद्ध अभ्यासातील सातत्य महत्वाचे - मयुरेश वाघमारे
आयइएसमध्ये देशात आठवा आल्याबद्दल संगमेश्वरमध्ये सत्कार
सोलापूर दिनांक ४ -
''आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. शासकीय सेवा असो वा खाजगी क्षेत्रातील उच्च पदे — प्रत्येक ठिकाणी ज्ञान, कौशल्य आणि संयमाची कसोटी लागते. अशा स्पर्धात्मक वातावरणात यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसते; त्यासोबत नियोजबद्ध अभ्यासातील सातत्य महत्वाचे आहे.''
असा सल्ला आयएएस श्रेणीतील भारतीय आर्थिक सेवेत महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेल्या मयुरेश वाघमारे यांनी दिला.ते आयइएसमध्ये देशात आठवा, महाराष्ट्रातून पहिला आल्याबद्दल संगमेश्वर कॉलेजमध्ये आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. व्यासपीठावर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे उपस्थित होते.
ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले '' सातत्य म्हणजे एखाद्या उद्दिष्टासाठी नियमित आणि ठरावीक वेळ देत राहणे. अभ्यासातील सातत्य म्हणजे रोजच्या दिनचर्येत अभ्यासाला ठराविक स्थान देणे, अभ्यासाच्या वेळेत विचलित न होणे आणि परिस्थिती कोणतीही असो, प्रयत्न सुरू ठेवणे महत्वाचे आहे.
स्पर्धा परीक्षेतील अभ्यास हा दीर्घकालीन आणि सखोल असतो. त्यात शेकडो विषय, असंख्य संकल्पना आणि सतत बदलणारे अभ्यासक्रम असतात. अशावेळी जर विद्यार्थी अधूनमधूनच अभ्यास करतो, तर त्याचा वेग आणि एकाग्रता दोन्ही कमी होतात. सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास — ज्ञान साठा हळूहळू वाढतो. विषयांची सखोल समज तयार होते.पुनरावृत्ती सोपी होते.आत्मविश्वास वाढतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ताण कमी होतो.सातत्य टिकवण्यासाठी काही उपाय करायचे झाल्यास ठराविक वेळापत्रक तयार करा.रोज किती वेळ कोणत्या विषयासाठी द्यायचा हे आधीच ठरवा. लहान उद्दिष्टे ठेवा .दररोजचे आणि साप्ताहिक ध्येय निश्चित करा. स्वत:चे मूल्यमापन करा .वेळोवेळी टेस्ट घ्या किंवा जुने पेपर सोडवा.आरोग्याकडे लक्ष द्या . चांगली झोप, संतुलित आहार आणि व्यायाम यामुळे मन स्थिर राहते. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.अपयश आल्यास निराश न होता त्यातून शिकणे हेच सातत्याचे खरे लक्षण आहे''.
भारतीय आर्थिक सेवा याविषयी बोलताना त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले,'' भारतीय आर्थिक सेवा (Indian Economic Service - IES) ही भारत सरकारच्या आर्थिक धोरणांच्या नियोजन, विश्लेषण आणि अंमलबजावणीसाठी कार्य करणारी एक महत्त्वाची केंद्रीय सेवा आहे. या सेवेच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासाच्या दिशेने ठोस आणि शास्त्रीय पद्धतीने निर्णय घेण्यास मदत होते.
या परीक्षेचे आयोजन संघ लोकसेवा आयोग (UPSC) दरवर्षी करतो. उमेदवाराने अर्थशास्त्र, अनुप्रयुक्त अर्थशास्त्र, व्यवसाय अर्थशास्त्र किंवा अर्थसांख्यिकी (Econometrics) या विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेली असणे आवश्यक असते. परीक्षेचे दोन टप्पे असतात — लेखी परीक्षा आणि मुलाखत. या परीक्षेत उमेदवाराची आर्थिक समज, विश्लेषणात्मक विचारशक्ती आणि प्रशासकीय दृष्टिकोन तपासला जातो.
निवड झाल्यानंतर अधिकारी वित्त मंत्रालय, निती आयोग, वाणिज्य मंत्रालय, कृषी मंत्रालय, योजना आयोग (Planning Department) इत्यादी ठिकाणी काम करतात. त्यांचे काम आर्थिक धोरणांचे विश्लेषण, बजेट नियोजन, विकास आराखडे तयार करणे, तसेच आर्थिक आकडेवारीचे संकलन आणि मूल्यांकन करणे असे असते.
या सेवेतील अधिकाऱ्यांना आकर्षक पगार, सरकारी सुविधा आणि राष्ट्रसेवेची संधी मिळते. सुरुवातीला सहायक संचालक (Assistant Director) या पदावरून सुरुवात होते आणि अनुभव व कार्यक्षमतेनुसार मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Economic Adviser) या उच्च पदापर्यंत बढती मिळू शकते.भारतीय आर्थिक सेवा ही देशाच्या आर्थिक प्रगतीचा पाया मजबूत करणारी सेवा आहे. अर्थशास्त्रात रुची असलेल्या आणि देशाच्या विकासात योगदान देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सेवा एक उत्कृष्ट करिअरची दिशा ठरते''.
आपल्या अध्यक्षीय भाषणात धर्मराज काडादी यांनी मयुरेश वाघमारे यांचा देशात आठवा, महाराष्ट्रातून पहिला आल्याबद्दल कॉलेजच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की,'' संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये नेहमी परराज्यातील अर्थात यूपी बिहारच्या विद्यार्थ्यांचा दबदबा असायचा, परंतु आपणही या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो,उत्तुंग यश मिळू शकतो हे मयुरेशने सिद्ध करून दाखवले आहे.अत्यंत लहान वयामध्ये त्यांनी हे यश मिळवले आहे.मयुरेश स्पर्धा परीक्षेसाठी गरजेच्या असलेल्या कौटुंबिक वातावरणातून आलेला आहे. त्याचे व्यक्तिमत्व यशाकडे यायला कारणीभूत आहे. तो आपल्या कॉलेजचा तो स्पोर्ट्समन होता हेही महत्त्वाचे आहे. त्याच्या अभ्यासातील सातत्याने त्याने हे यश मिळवले आहे, मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो.''
संगमेश्वर कॉलेज विषयी------स्पोर्ट्स कोट्यातून संगमेश्वरमध्ये मला प्रवेश मिळाला.संगमेश्वर कॉलेजमध्ये स्पोर्ट्समध्ये मला खूप सपोर्ट मिळाला.क्रिकेट हा माझ्या आवडीचा खेळ. त्यातून मी शिकत गेलो आणि क्रिकेटच्या टूर्नामेंटमध्ये देखील मला चांगला सहभाग नोंदवता आला. ते केवळ संगमेश्वरमुळेच.इथली क्रीडा परंपरा खूप मोठी आहे. त्यात मला खेळता आले हे माझे भाग्य समजतो. पुढे त्याचा फायदा मला परीक्षेमध्ये झाला.
प्रारंभी बीए सिव्हिल सर्व्हिसेस विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. वंदना भानप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संतोष पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर पाहुण्यांचा कॉलेजच्या वतीने माननीय धर्मराज काडादी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर मयुरेश वाघमारे यांनी दिलखुलाससंवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रिद्धी बुवा यांनी केले आभार प्रा.डॉ.राहुल साळुंखे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा