वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच सर्वसमावेशक विकास होतो -- अनिल बनसोडे
संगमेश्वरमध्ये विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन
सोलापूर दिनांक- २२ शिक्षणाच्या क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे विद्यार्थी प्रश्न विचारू लागतो, संशोधन करू लागतो आणि नव्या कल्पना जन्माला येतात. याच विचारांतून वैज्ञानिक, संशोधक, अभियंते आणि समाजसुधारक घडतात. आपल्या समाजासमोर अनेक समस्या आहेत—अंधश्रद्धा, जातिभेद, लिंगभेद, आर्थिक विषमता, पर्यावरणाचा ऱ्हास. या सर्व समस्यांवर मात करण्याची ताकद फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातच आहे.जो समाज वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारतो, तोच समाज समतावादी, प्रगत आणि मानवतावादी बनतो. म्हणूनच खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक म्हणजेच सर्व घटकांचा विकास ,वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच होतो.शिक्षण निरीक्षक अनिल बनसोडे यांचे प्रतिपादन. ते संगमेश्वर कॉलेजच्या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन समिती सदस्य शरणराज काडादी,प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, सोलापूर सायन्स सेंटरचे क्युरेटर राहुल दास,उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे,प्रकल्प समन्वयक विश्वजीत आहेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर सायन्स सेंटर आणि संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन संगमेश्वर कॉलेजच्या सायन्स विभागात करण्यात आले आहे.विज्ञान प्रकल्प प्रदर्शनामध्ये उच्च माध्यमिक विद्यालय, तंत्रनिकेतन विद्यालय, शेतकी महाविद्यालयामधील विद्यार्थी सहभागी झालेआहेत. या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे यंदाचे हे नववे वर्ष आहे.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार झाला.सोलापूर सायन्स सेंटरचे क्युरेटर राहुल दास सोलापूर सायन्स सेंटरच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर वैज्ञानिक दालनांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन करून रूपाली अंबुलगे यांनी सर्वांचे आभार मानले.याप्रसंगी विज्ञान समन्वयक विशाल जत्ती यांच्यासह विज्ञान विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्रयोग सादरकर्ते विद्यार्थी उपस्थित होते.

































































टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा