भूगोलच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी - सचिन पन्हाळकर
संगमेश्वर मध्ये भूगोल दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा
सोलापूर, दि. १८-
सध्याच्या युगामध्ये भूगोल हा विषय अतिशय महत्त्वाचा व जीवनोपयोगी असून भूगोलामध्ये नवीन अभ्यास क्षेत्र भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागप्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर यांनी केले. येथील संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) मधील भूगोल विभाग व सोलापूर भूगोल शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना भूगोलाचे महत्त्व समजावे व स्पर्धा परीक्षेची ओळख होऊन या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकावेत, या उद्देशाने भूगोल दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करताना डॉ. पन्हाळकर बोलत होते.
या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूर भूगोल शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. शिवराया अडवितोट, सचिव डॉ. दीपक देडे, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी तसेच प्रा.डॉ. सचिन राजगुरू, प्रा.डॉ. दीपक नारायणकर, प्रा. डॉ. बापू राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. राजकुमार मोहरकर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. शिवाजी मस्के यांनी करून दिला. दरम्यान, या स्पर्धेमध्ये राज्यातील विविधमहाविद्यालयांतून ११९ भूगोलप्रेमी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.या राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रथमेश पुरुड (प्रथम), दीपा सालोटगीमठ (द्वितीय), ऐश्वर्या अंबुळगी हिने (तृतीय क्रमांक) पटकावला. त्यांना रोख बक्षीस, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विश्वनाथ श्रावणी व गौस अन्सारी यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शिरीष जाधव, प्रा. डॉ. प्रकाश कादे, प्रा.डॉ. राहुल साळुंखे, प्रा. रिद्धी बुवा व धनंजय बच्छाव आदींचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मंजू संगेपाग यांनी केले तर आभार प्रा. डॉ. वैभव इंगळे यांनी मानले.

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा