मराठी भाषा विदयार्थ्यांना जगण्याचे मार्ग दाखवते - प्रा.डॉ.इ.जा.तांबोळी
संगमेश्वरमध्ये मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन
सोलापूर प्रतिनिधी - १२ जुलै - ''मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ज्ञान, संस्कृती, विचार आणि रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करून देणारी समृद्ध भाषा आहे. आजच्या डिजिटल युगात मराठी भाषेचे महत्त्व अधिक वाढले असून विविध क्षेत्रांमध्ये मराठी जाणकारांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत.
मराठी विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन, पत्रकारिता, संपादन, वृत्तनिवेदन, आकाशवाणी व दूरदर्शन, प्रकाशन व्यवसाय, जाहिरात लेखन, अनुवाद, दुभाषी सेवा, पटकथा व संवाद लेखन, ब्लॉग लेखन, डिजिटल कंटेंट रायटिंग, सोशल मीडिया व्यवस्थापन, ई-लर्निंग, संशोधन, ग्रंथालय व माहितीशास्त्र, तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये भाषा तज्ज्ञ म्हणून काम करण्याच्या अनेक संधी आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) आणि मातृभाषेला मिळणारे वाढते महत्त्व यामुळे मराठी विषयातील तज्ज्ञांची गरज अधिक वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई-पुस्तके, संकेतस्थळे, मोबाईल अॅप्स आणि डिजिटल माध्यमांसाठी दर्जेदार मराठी मजकूर तयार करणाऱ्या कुशल व्यक्तींना मोठी मागणी निर्माण झाली आहे.
मराठी भाषा विद्यार्थ्यांना केवळ नोकरीच नव्हे तर स्वयंरोजगाराच्याही संधी उपलब्ध करून देते. स्वतंत्र लेखक, संपादक, अनुवादक, युट्यूब व पॉडकास्ट निर्माते, ऑनलाइन प्रशिक्षक, प्रकाशन व्यवसाय, तसेच डिजिटल कंटेंट निर्माते म्हणूनही यशस्वी करिअर घडविता येते.
आजच्या काळात मराठी भाषा ही रोजगार, उद्योजकता आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा मजबूत पाया ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे सखोल ज्ञान आत्मसात करून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उज्ज्वल भविष्य घडविणे शक्य आहे. खऱ्या अर्थाने मराठी भाषा जगण्याचे मार्ग दाखवते हे विधान आजच्या बदलत्या काळात अधिक सार्थ ठरते.असे प्रतिपादन लेखक प्रा.डॉ.इ.जा.तांबोळी यांनी केले. संगमेश्वर कॉलेज मराठी विभागाच्या वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रा.डॉक्टर ऋतुराज बुवा उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सारीपुत्र तुपेरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. लतिका कट्टीमनी यांनी करून दिला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले की, '' मराठी वाङ्मय मंडळाच्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्य, भाषा, संस्कृती आणि विविध ज्ञानशाखांविषयी संवाद घडतो. या परस्पर विचारविनिमयातून सर्जनशीलता, भाषिक अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक जाणीव विकसित होऊन मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अधिक समृद्ध व वृद्धिंगत होत राहते.'' सूत्रसंचालन प्रा. सतीश हेगडे यांनी केले आभार प्रा.संगीता मोहिते यांनी मानले. या प्रसंगी मराठी विभागातील प्रा. शिंदे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
चौकट
भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून मानवी मूल्ये जोपासण्याचे प्रभावी माध्यम आहे. प्रेम, करुणा, सहिष्णुता, समता, बंधुता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी यांसारखी मूल्ये साहित्य, लोकपरंपरा आणि संस्कारातून भाषेच्या माध्यमातून पिढ्यान्पिढ्या पोहोचतात. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच संवेदनशील, सुसंस्कृत आणि मूल्यनिष्ठ समाज घडविण्यात भाषेची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा