संधी, क्षमता आणि आवड यांचा समन्वय साधून करिअर घडवा – मनोज राऊत
सिव्हिल सर्व्हिसेस विभागाच्या वतीने स्पर्धा परीक्षेवर व्याख्यान
सोलापूर, दि. १७ जुलै २०२६ : "संधी, क्षमता आणि आवड यांचा समन्वय साधून करिअर घडवा. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची आवड ओळखून त्यानुसार आवश्यक क्षमता विकसित केली पाहिजे. निरर्थक इंटरनेट स्क्रोलिंगपासून दूर राहून वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते," असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO) मा. मनोज राऊत यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज, सोलापूर येथील बी.ए. सिव्हिल सर्व्हिसेस विभागाच्या वतीने आयोजित विद्यार्थी असोसिएशन उद्घाटन व मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा,उपप्राचार्य डॉ. राजकुमार मोहोरकर आदी उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय सेवा या विषयावर पुढे बोलताना मनोज राऊत म्हणाले, "मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोनं करण्याची तयारी ठेवा. मोबाईल आणि इंटरनेटचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता ज्ञान संपादन, कौशल्यविकास आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी करा. सकारात्मक दृष्टीकोन, शिस्त, सातत्य आणि कठोर परिश्रम हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आजची योग्य दिशा आणि नियोजन उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवते."
मार्गदर्शनानंतर शंका- समाधान झाले.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय सेवा, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि करिअरविषयक विविध प्रश्न विचारले. मनोज राऊत यांनी प्रत्येक प्रश्नाला सविस्तर, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी उत्तरे देत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रारंभी बी.ए. सिव्हिल सर्व्हिसेस विभागप्रमुख डॉ. वंदना भानप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. राहुल साळुंखे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी निशा चौगुले व स्नेहल पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. नविता बल्लाळ यांनी मानले . यावेळी डॉ. शिरीष जाधव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा