मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘ती’चे विधिकवच या उपक्रमातून मार्गदर्शन
संगमेश्वर कॉलेजमध्ये कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
सोलापूर, दि. १६ ऑक्टोबर २०२६ :जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने, माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत ‘जागर नारीशक्तीचा : तीचे विधिकवच’ या संकल्पनेतून कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता संगमेश्वर महाविद्यालय (कनिष्ठ विभाग), सोलापूर येथे करण्यात आले. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम (POCSO), २०१२, अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम, संबंधित कायदे आणि मुलींचे स्वसंरक्षण या विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे सचिव तथा न्यायाधीश मा. अमोलकुमार अ. देशपांडे उपस्थित होते. त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची कार्यपद्धती, नागरिकांना उपलब्ध असणाऱ्या मोफत विधी सेवा आणि कायदेशीर मदतीविषयी सविस्तर माहिती दिली. अन्याय किंवा अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींनी भीती न बाळगता पुढे येऊन कायदेशीर मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मुलींच्या हक्कांचे संरक्षण, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि न्याय मिळविण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
बोजू -रिऊ मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या कु. प्रचिता जोगदांडे यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे महत्त्व प्रात्यक्षितातून पटवून दिले. संकटाच्या प्रसंगी प्रसंगावधानता राखणे, आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करणे आणि स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित सरावामुळे शारीरिक क्षमता आणि मानसिक धैर्य वाढते, असेही त्यांनी नमूद केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे वरिष्ठ लिपिक नितीन उपरे यांनी संबंधित कायद्यांची माहिती देऊन विद्यार्थिनींचे प्रबोधन केले. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणाऱ्या कायद्यातील तरतुदी, अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम आणि अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर मदत कशी घ्यावी, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे आणि योग्य वेळी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कनिष्ठ विभाग उपप्राचार्य मा. श्री. प्रसाद कुंटे यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये कायद्याविषयी जागरूकता आणि आत्मविश्वास वाढतो, असे सांगितले. विद्यार्थिनींच्या प्रबोधनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आणि उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी कन्नूरकर यांनी केले, तर कोमल कोंडा यांनी आभार मानले. विद्यार्थिनींना कायदेशीर हक्क, सुरक्षितता आणि स्वसंरक्षण यांची जाणीव करून देणारा हा उपक्रम उपयुक्त ठरला.या प्रसंगी संतोष पवार,राहुल बिराजदार ,तेजश्री तळे यांच्यासह बहुसंख्य विद्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या .
चौकटी
१ मा. श्री. अमोलकुमार अ. देशपांडे ( सचिव तथा न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर )
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना आणि पीडितांना कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. प्रत्येक बालकाला सुरक्षित वातावरणात जगण्याचा आणि शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ हा बालकांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा कायदा आहे. कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा अत्याचार सहन न करता विद्यार्थिनींनी विश्वासार्ह व्यक्ती, संबंधित यंत्रणा किंवा विधी सेवा प्राधिकरणाची मदत घ्यावी.अनुचित वर्तन, छळ किंवा अत्याचाराच्या प्रसंगी योग्य व्यक्तीला माहिती देऊन संबंधित यंत्रणेची मदत घ्यावी. कायद्याची माहिती, जागरूकता आणि धैर्य यांच्या बळावर मुली स्वतःचे हक्क प्रभावीपणे जपू शकतात.
२. मा. कु. प्रचिता जोगदांडे
बोजू -रिऊ मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमी, सोलापूर स्वसंरक्षण ही केवळ शारीरिक कला नसून आत्मविश्वासाने जगण्याची एक महत्त्वाची क्षमता आहे. संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखणे आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.स्वसंरक्षणाचे तंत्र नियमित सरावातून शिकल्यास शारीरिक क्षमता आणि मानसिक धैर्य वाढते. कोणतीही अनुचित घटना घडल्यास स्वतःला दोष न देता विश्वासार्ह व्यक्तीची मदत घ्यावी.प्रत्येक मुलीने स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहून निर्भयपणे शिक्षण घ्यावे आणि आयुष्यात पुढे जावे.
३. मा. श्री. नितीन उपरे वरिष्ठ लिपिक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर विद्यार्थिनींना आपल्या कायदेशीर हक्कांची आणि संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ बालकांना लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.अंमली पदार्थांचे सेवन आरोग्य, शिक्षण, कुटुंब आणि सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम करू शकते.कायद्याचे ज्ञान, योग्य निर्णयक्षमता आणि स्वसंरक्षणाची तयारी यांमुळे सुरक्षित समाजनिर्मितीला हातभार लागतो.
४ मा. श्री. प्रसाद कुंटे (उपप्राचार्य ) विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कायदेविषयक जनजागृती करणारे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत.आजच्या कार्यक्रमातून विद्यार्थिनींना कायदेशीर हक्क, स्वसंरक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांची माहिती मिळाली. प्रत्येक विद्यार्थिनीने मिळालेल्या मार्गदर्शनाचा उपयोग दैनंदिन जीवनात करून स्वतःसह इतरांनाही जागरूक करावे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून भयमुक्त, सुरक्षित आणि कायद्याचा आदर करणारा समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया.











टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा