नवसंशोधनातूनच समाजाचा विकास होईल : डॉ. खराडे
संगमेश्वरमधील राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप
संचार प्रतिनिधी
सोलापूर, दि. २४-
नव्या संशोधकांनी समाजोपयोगी संशोधन करण्यावर भर द्यावा. कारण अशा नवसंशोधनातूनच समाजाचा विकास होईल असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे यांनी मांडले. संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) मधील ग्रंथालय विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पीएम-उषा अनुदानांतर्गत संशोधन आणि नवनिर्मिती-परिवर्तन घडविण्यासाठी विविध ज्ञानशाखांना ग्रंथालयामध्ये जोडण्याची सराव आणि कार्यपध्दती, भविष्यातील सेवांसाठी एक बहुविद्याशाखीय दृष्टिकोन' या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय समारोपप्रसंगी चर्चासत्राच्या प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा होते. याप्रसंगी ग्रंथपाल डॉ. विजयकुमार मुलीमनी, डॉ. अशोक खोब्रागडे, डॉ. प्रिन्स अजयकुमार आगासे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. खराडे यांनी आपल्या भाषणात नव्या संशोधकांना मूलभूत मार्गदर्शन केले. संशोधकांनी ग्रंथालयाचा वापर संशोधनकायांसाठी करावा. आपले आंतरविद्याशाखीय संशोधन ठेवावे. यातून समाजाला दिशा मिळेल. तळागळातील सर्वसामान्य माणसापर्यंत संशोधन पोहचायला हवे. यासाठी संशोधक, मार्गदर्शक आणि ग्रंथालयांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, असे विचार त्यांनी मांडले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. बुवा यांनी ग्रंथालय विभागाचे कौतुक केले. संशोधनाच्या अभ्यासकांना क्षेत्रातील नवी दिशा देण्याचे कार्य या चर्चासत्रातून निश्चित झाले असेल असा आशावाद त्यांनी मांडला. विशेषतः विद्यापीठाच्या सहकार्याने हे चर्चासत्र यशस्वीपणे संपन्न झाले. याबद्दलची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
समारोप सत्राचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. विजयकुमार मुलीमनी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. रेवप्पा कोळी यांनीकरून दिला. आभार सहायक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. पुष्पांजली मेत्री आणि डॉ. सोनाली गिरी यांनी केले. रविषा चिंचोळकर, मंगल गायकवाड आणि सुयश कविटकर या संशोधकांनी मनोगते व्यक्त केली सर्व सहभागीना प्रमाणपत्रे देण्यात आली.
संगमेश्वरमधील राष्ट्रीय चर्चाप्रसंगी डॉ. महादेव खराडे, डॉ. ऋतुराज बुवा, डॉ. विजयकुमार मुलीमनी, डॉ. अशोक खोब्रागडे व अन्य.








टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा