कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सभागृहाचे उद्घाटन


आपण कितीही मोठे झालो तरी माणुसकी जपली पाहिजे

पद्मश्री ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन

संचार प्रतिनिधी , सोलापूर, दि. ३१- आपण ज्ञानी असून उपयोग नाही तर माणूसही असायला हवे. आपण कितीही मोठे झालो तरी माणुसकी जपली पाहिजे, असे प्रतिपादन पद्मश्री तथा राज्यसभेचे खासदार विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी केले.

मंगळवारी, प्रा. ठाकरे गौरव संस्था, संगमेश्वर महाविद्यालय आणि लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने आयोजित संगमेश्वर महाविद्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सभागृहाचे उद्घाटन आणि 'राष्ट्रीय गणितरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात पद्मश्री अॅड. निकम बोलत होते. विज्ञान संस्था बंगळुरू येथील प्रा. वामसी प्रीतम पिंगाली यांना गणितरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी हायड्रोलिक्सचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे होते. याप्रसंगी विचारपीठावर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, संस्थेचे अध्यक्ष विधिज्ञधनंजय माने, संस्थेच्या सचिव ज्योती काडादी, माजी कुलगुरू तथा प्रा. ठाकरे गौरव संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. के. ठाकरे, प्राचार्य प्रा. ऋतुराज बुवा उपस्थित होते. संस्थेच्या कामात काही असंतुष्ट मंडळींकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याची खंत धर्मराज काडादी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली होती. तोच धागा पकडून पद्मश्री विधिज्ञ निकम म्हणाले, आपण पुढे जात असताना अनेक शत्रू तयार होत असतात. अनेक निंदक तयार होत असतात. आपल्या प्रगतीबद्दल असूया असलेली माणसे त्रास देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांच्याकडे लक्ष न देता आपण काम करायला हवे, असा सल्लाही विधिज्ञ निकम यांनी पुढे बोलताना म्हणाले  तुमच्या वाटचालीत काही अडचणी आल्यास मी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहीन, अशी ग्वाही विधिज्ञ निकम यांनी देताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

प्रारंभी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य प्रा. ऋतुराज बुवा यांनी केले. लक्ष्मी हायड्रॉलिक्सच्या संचालिका सुप्रिया ठाकरे यांनी सत्कारमूर्ती प्रा. वामसी पिंगाली यांच्या सन्मानपत्राचे वाचन केले. प्रा. बाळासाहेब वाफरे यांनी

प्रा. ठाकरे गौरव संस्थेचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी धुमाळ यांनी केले. मधुकर पवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमास श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुष्पराज काडादी ,शरणराज काडादीआणि काडादी परिवार, लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे संचालक आदित्य ठाकरे आणि ठाकरे परिवार, श्री सिध्देश्वर देवस्थानचे विश्वस्त, सिध्देश्वर साखर कारखान्याचे संचालक, यांच्यासह श्री सिध्देश्वर शिक्षण संकुलातील प्राध्यापक सोठ्या संख्येने उपस्थित होते.

उदात्त परंपरेचा गौरव - काडादी 

राष्ट्रनिष्ठ व देशभक्तीने प्रेरित होऊन आपले संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी अर्पण केलेल्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांचे नाव सभागृहाला दिले जाणार असल्याने त्यांच्यासारखेच समर्पित भावाने देशसेवा केलेल्या व्यक्तीच्या हस्ते हा सोहळा व्हावा ही आमची इच्छा होती. भारतीय न्यायव्यवस्थेतील धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांच्या रूपाने ती इच्छा पूर्ण झाल्याचे संगमेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी सांगितले. हा सोहळा केवळ एका सभागृहाच्या उ‌द्घाटनापुरता मर्यादित नसून एका उदात्त परंपरेचा गौरव आहे. एका कर्मयोगीच्या चिरंतन कार्याला अर्पिलेली ही आदरांजली असल्याचेही काडादी यांनी सांगितले.

आगामी काळ गणिताचा सुवर्णकाळ : प्रा. पिंगाली

गणिताबद्दल खूप गैरसमज आहेत. इतर विषयांच्या तुलनेत गणित दुर्लक्षित आहे. मात्र, प्रा. ठाकरे गौरव संस्थेने गणिताला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सत्कारमूर्ती प्रा. वामसी पिंगाली यांनी सांगितले. एआय तंत्रज्ञानाने कवेत घेतलेला हा काळ गणितासाठी सुवर्णकाळ असल्याचा विश्वासही प्रा. पिंगाली यांनी व्यक्त केला.

गणितासह नवरत्न पुरस्कार देणार : ठाकरे

प्रा. ठाकरे गौरव संस्थेच्यावतीने गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर गणितरत्न पुरस्कार दिला जातो. आता पुढील वर्षांपासून साहित्य, वैद्यकीय, कृषी आणि इतर विज्ञान शाखांतील उल्लेखनीय योगदानासाठी नवरत्न पुरस्कार देणार असल्याची घोषणा शरद ठाकरे यांनी केली. या पुरस्कारांसाठी निवड प्रक्रिया नोबेलच्या धर्तीवर पारदर्शकपणे होईल. सोलापुरातच या पुरस्कारांचे वितरण होईल असेही ठाकरे यांनी सांगितले.








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी