उत्तम संवाद व लेखन या अर्जित कला- डॉ. महेश खरात

संगमेश्वरमध्ये एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी कार्यशाळा संपन्न, १३६ सहभागी 

सोलापूर : २१ सप्टेंबर २०२६.

कला या मानवी प्रतिभेचा आविष्कार असतात. त्यातून जीवनात आनंद निर्माण होतो. माणसाने भाषा घडवली. एकमेकांशी संवाद साधला. परंतु भाषा अस्तित्वात येण्याअगोदर मानव आपल्या कलेचा आविष्कार रंग, रेषा व विविध रेखाटनांच्या माध्यमातून करू लागला. हा त्याचा आत्माविष्कार होता. त्यामुळे कोणतीही कला उपजत नसते. ती शिकावी लागते. ती  प्रयत्न करून अर्जित करावी लागते. म्हणून उत्तम संवाद व लेखन या कलासुद्धा अभ्यास, सराव करून आत्मसात कराव्या लागतील असे विचार पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता व भाषा व वाङमय संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. महेश खरात यांनी व्यक्त केले.


संगमेश्वर महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी संवाद आणि लेखन कौशल्ये’ या विषयावरील एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांची तर कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. राजकुमार मोहरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. खरात म्हणाले, संवाद चुकला तर आयुष्यातील आनंद हरवू शकतो, त्यामुळे संवादाचे शास्त्र समजून घेणे गरजेचे आहे.  विद्यार्थ्यांनी संत साहित्याचे वाचन करावे आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. भाषेच्या प्रवासापासून ते प्रभावी संवाद आणि वक्तृत्वापर्यंत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. भाषण ही एक कला असून ती अर्जित करावी लागते, असे सांगत विद्यार्थ्यांनी वक्तृत्वकलेचा सराव करण्याचे आवाहन करण्यात आले. भाषण करताना पाठांतराचे महत्त्व, प्रभावी वक्तृत्व कसे असावे आणि सूत्रसंचालन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी संवाद हा मानवी जीवनातील महत्वाचा भाग आहे. यातून नाती निर्माण होतात. जुनी पिढी व नवी पिढी यामधील दुरावा दूर करण्यासाठी संवाद खूप महत्वाचा आहे. तरुण पिढीने याकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले. 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. राधिका शिंदे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. लतिका कट्टीमणी यांनी तर आभार प्रा. सतीश हेगडे यांनी मानले. यावेळी डॉ. सारीपुत्र तुपेरे लिखित ‘संशोधन लेखन पद्धती’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. संघप्रकाश ड्डे, डॉ. प्रा. संगीता मोहिते, डॉ. शिवाजी मस्के, डॉ. दादासाहेब खांडेकर, डॉ. बजरंग मेटील, डॉ. प्रवीण राजगुरू, डॉ. हल्लोळी, डॉ. मेटकरी व विद्यार्थी उपस्थित होते.

चौकटी : 

सूत्रसंचालन ही प्रभावी संवाद कला : सुप्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले

निवेदन आणि सूत्रसंचालन या जीवनाला नवा आयाम देणाऱ्या कला आहेत. प्रभावी बोलण्यासाठी उच्चार, शब्द, लय व  भाषा यांची सांगड घालावा लागते. प्रभावी संवादातून सूत्रसंचालन  व  निवेदन कला आत्मसात करता येते. 

वक्तृत्व हा विचारांचा उत्कट आविष्कार : वक्ते व पत्रकार दत्ता थोरे

वक्तृत्व व भाषण या दोन प्रमुख भाषिक कला आहेत. या कलांचे कौशल्य आत्मसात करावे लागते. यासाठी वाचन, चिंतन आणि  भावतालाचे आकलन करून घेणे खूप गरजेचे असते. प्रत्येक विद्यार्थ्याने कॉलेज जीवनामध्ये विविधांगी विचारधारांचे वाचन करून आपल्या वैचारिक भूमिका बांधून घ्याव्यात. 

लेखनासाठी भाषाभान वाढवावे : लेखक प्राचार्य डॉ. महेंद्र कदम

लेखन ही एक प्रक्रिया आहे. त्याकडे गांभीर्याने पहावे. लेखनात शब्द मांडणी महत्वाची असते. एक शब्द अर्थाचा अनर्थ करू शकतो. यासाठी विद्यार्थ्यानी भाषेचे नियम समजून घ्यावेत. आपले भाषाभान वाढवावे.












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'किताब और मैं' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

संधी, क्षमता आणि आवड यांचा समन्वय साधून करिअर घडवा – मनोज राऊत

विद्यार्थ्याने जाणून घेतला भारतीय हवामान विभाग