अल्कोहोल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम तृतीय बॅच प्रमाणपत्र वितरण समारंभ
अडचणींना संधी मानून यशाचा मार्ग शोधा
संगमेश्वरमधील कार्यक्रमात जाधव यांचा विद्यार्थ्यांना संदेश
संचार प्रतिनिधी
सोलापूर, दि. ४-सोलापूर, दि. ४-
कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. कोणतेही काम करण्यास कमीपणा न मानता प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी ठेवली, तर निश्चितच यश मिळते. जीवनात अडचणी आल्या तरी डगमगून न जाता त्याकडे संधी म्हणून पाहून यशाचा मार्ग शोधला पाहिजे, असा प्रेरणादायी संदेश जकराया शुगरचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांनी विद्यार्थ्यांना दिला. संगमेश्वर स्वायत्त महाविद्यालयातील अल्कोहोल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या तृतीय बॅचच्या प्रमाणपत्र वितरण समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संगमेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी होते.
जाधव म्हणाले, उद्योग क्षेत्राच्या गरजा आणि विद्यार्थ्यांना मिळणारे पारंपरिक ज्ञान यातील तफावत दूर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी उद्योगाच्या गरजा समजून घेत तांत्रिक कौशल्ये, व्यावहारिक ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव आत्मसात करावा. शुगर व डिस्टिलरी उद्योगातील सद्यःस्थिती, या क्षेत्रासमोरील आगामी आव्हाने तसेच रोजगार, व्यवसाय आणि संशोधनाच्या उपलब्ध संधींचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात काडादी यांनी शिक्षणासोबत कौशल्यविकास, शिस्त, सकारात्मक दृष्टिकोन आणि जबाबदारीची भावना जोपासण्याचे आवाहन केले. संगमेश्वर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाने अल्कोहोल टेक्नॉलॉजी क्षेत्रात केलेल्या कार्याचे कौतुक करून जकराया शुगरसारख्या यशस्वी उद्योग समूहाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण तसेच संशोधनाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी स्वागतपर भाषणात अल्कोहोल टेक्नॉलॉजीसारखा कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यामागील संस्थेची भूमिका स्पष्ट केली. प्रास्ताविक डॉ. प्रताप गोरे-पाटील यांनी केले, तर प्रा. गौरी जमादार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी पदवी प्राप्त विद्यार्थी अमोगसिध्द म्हेत्रे आणि दीपक सताळे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य ए. के. हुल्ली, उपप्राचार्य डॉ. दत्तकुमार म्हमाणे, डॉ. राजकुमार मोहरकर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. पुष्पांजली मेत्री व प्रा. मृणाल कुलकर्णी यांनी केले. आभार विभागप्रमुख डॉ. उध्दव मंडले यांनी मानले.
सोलापूर संगमेश्वर स्वायत्त महाविद्यालयातील अल्कोहोल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या तृतीय बॅचमधील गुणवंतांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी सचिन जाधव, धर्मराज काडादी व अन्य



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा