अभ्यासासोबत प्रभावी संवादातून उत्तम वक्तृत्व घडत जाते - सिद्धाराम पाटील


संगमेश्वरमध्ये राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 

सोलापूर प्रतिनिधी, दिनांक  १५ - उत्तम वक्ता घडण्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नसतो; त्या ज्ञानाला प्रभावी संवादाची जोड मिळणे आवश्यक असते. जगप्रसिद्ध संशोधक निकोला टेस्ला यांनी आपल्या वैज्ञानिक विचारांची प्रभावी मांडणी करून जगाला नवे तंत्रज्ञान समजावून सांगितले. त्यामागची प्रेरणा स्वामी विवेकानंदांची होती. स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या धर्मपरिषदेत प्रभावी संवादातून भारतीय संस्कृतीची महानता जगासमोर मांडली.तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ज्ञान, अनुभव आणि संवादकौशल्याच्या बळावर लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यामुळे अभ्यासातून विचारसमृद्धी आणि संवादातून विचारांची प्रभावी अभिव्यक्ती होते. या दोन्हींच्या संगमातूनच आत्मविश्वासू आणि उत्तम वक्ता घडतो.परिणामी अभ्यासासोबत प्रभावी संवादातून उत्तम वक्तृत्व घडते. असे प्रतिपादन दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांनी केले. संगमेश्वर कॉलेजमध्ये कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र.प्राचार्य ऋतुराज बुवा,निवृत्त उपप्राचार्य बी. एन. पटणे, उपप्राचार्य डॉ.राजकुमार मोहरकर,रात्र महाविद्यालयाचे  प्राचार्य एसडी गोटे,आदी उपस्थित होते.


                                           श्री संगमेश्वर गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला.त्यानंतर कर्मयोगी अप्पासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांनी संयोजक या नात्याने प्रास्ताविक केले. त्यांनी कर्मयोगी अप्पांच्या कार्याचा आढावा घेत स्पर्धे मागचा उद्देश स्पष्ट स्पष्ट केला. पाहुण्यांची ओळख दत्तात्रय  गुड्डेवाडी यांनी करून दिली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला. उपस्थित परीक्षक अभिराम सराफ आणि प्रा.डॉ.सोनाली गिरी यांचा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात कर्मयोगी आप्पासाहेब यांची प्रतिमा रांगोळी कलेच्या माध्यमातून साकारणारी वैष्णवी ताटे हिचा सत्कार झाला.आपल्या अध्यक्षीय समारोपात प्र. प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा यांनी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या समग्र कार्याचा आढावा घेत, सोलापूरातील तत्कालीन घटनांचा मागोवा घेतला. सूत्रसंचालन तेजश्री तळे आणि संगीता म्हमाणे यांनी केले तर पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांनी सर्वांचे आभार मानले. 

चौकट

आज समाजमाध्यमांच्या युगात दिखाऊ ज्ञानाचे प्रमाण वाढले आहे. अर्धवट माहितीच्या आधारावर आत्मविश्वासाने बोलणारे अनेकजण दिसतात. त्यामुळे ज्ञानाची खोली आणि अभिव्यक्तीची ताकद या दोन्हींचा समतोल आवश्यक आहे. अभ्यासातून ज्ञान मिळते, चिंतनातून विचार प्रगल्भ होतात आणि प्रभावी संवादातून ते विचार समाजापर्यंत पोहोचतात. म्हणूनच खरा वक्ता तोच, ज्याच्या शब्दांमागे ठोस ज्ञान, विचारांची स्पष्टता आणि प्रामाणिकपणा असतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'किताब और मैं' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

संधी, क्षमता आणि आवड यांचा समन्वय साधून करिअर घडवा – मनोज राऊत

विद्यार्थ्याने जाणून घेतला भारतीय हवामान विभाग