संगमेश्वर कॉलेजमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक
NCC कॅडेट्सनी घेतले आपत्कालीन परिस्थितीतील बचावकार्याचे धडे
सोलापूर, दि. २४ सप्टेंबर २०२६ : संगमेश्वर कॉलेज, सोलापूर येथे आज आपत्ती व्यवस्थापनाबाबत विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. संगमेश्वर कॉलेजच्या NCC विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपत्तीच्या काळात करावयाच्या उपाययोजना, बचावकार्य आणि प्रथमोपचार याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये सीआयएसएफ चे अग्निशामन दलाचे इन्स्पेक्टर ए के मती , हेडकॉन्स्टेबल मयूर पाटील व कॉन्स्टेबल वाघ यांनी उपस्थित राहून विविध आपत्ती व्यवस्थापन व अग्निसुरक्षेची प्रात्यक्षिके करून दाखवली.
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता, प्रसंगावधान, शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणे हा होता. विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या प्रसंगी स्वतःचा बचाव करण्याबरोबरच इतरांना मदत कशी करावी, याचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी आगीच्या दुर्घटनेच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी, बचावकार्य, प्रथमोपचार, जखमी व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढणे, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करणे आदी बाबींची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. तसेच आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता शांतपणे व शिस्तबद्ध पद्धतीने परिस्थिती हाताळण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमास संगमेश्वर कॉलेजच्या प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करताना विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान न घेता प्रत्यक्ष जीवनातील आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी संगमेश्वर कॉलेजच्या NCC अधिकारी कॅप्टन शिल्पा लब्बा व लेफ्टनंट तुकाराम साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ९ महाराष्ट्र बटालियन NCC, सोलापूरचे PI Staff यांची उपस्थिती होती. NCC कॅडेट्सनी या प्रात्यक्षिकांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
NCC कॅडेट्सना आपत्तीच्या काळात प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल व इतर आपत्कालीन यंत्रणांना सहकार्य करण्याची भूमिका समजावून सांगण्यात आली. आपत्तीच्या वेळी बचावकार्य, मदतकार्य, जनजागृती आणि आवश्यक ती प्राथमिक मदत करण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या प्रशिक्षणामुळे NCC कॅडेट्समध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, तत्परता, शिस्त, संघभावना आणि सामाजिक बांधिलकी विकसित होण्यास मदत झाली. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत समाजासाठी मदतीचा हात पुढे करण्यासाठी कॅडेट्स सज्ज राहतील, असा विश्वास या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगमेश्वर कॉलेजच्या NCC विभागाने विशेष परिश्रम घेतले.


.jpeg)
.jpeg)

.jpeg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा